फसवणूक सिद्ध करणे मुश्‍कील

सनील गाडेकर
रविवार, 28 एप्रिल 2019

आरोपी परदेशातील किंवा परराज्यातील अज्ञात व्यक्ती, गुन्ह्यात वापरलेले अद्ययावत तंत्रज्ञान, जामिनानंतर आरोपी गायब होणे, तपासादरम्यान इलेक्‍ट्रॉनिक पुरावे नष्ट करणे, अशा बाबींमुळे सायबर गुन्हे सिद्ध करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपांना शिक्षा झाल्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये तपासाला मर्यादा; शिक्षेचे प्रमाणही अत्यल्प
पुणे - आरोपी परदेशातील किंवा परराज्यातील अज्ञात व्यक्ती, गुन्ह्यात वापरलेले अद्ययावत तंत्रज्ञान, जामिनानंतर आरोपी गायब होणे, तपासादरम्यान इलेक्‍ट्रॉनिक पुरावे नष्ट करणे, अशा बाबींमुळे सायबर गुन्हे सिद्ध करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपांना शिक्षा झाल्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

सायबर गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता पोलिसांनी गुन्हे शाखेअंतर्गत ‘सायबर सेल’ची स्थापना केली. गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी अनेकदा परदेशातील किंवा परराज्यातील अज्ञात व्यक्ती असतात. त्यांचा माग काढणे पोलिसांना सहजासहजी शक्‍य नसते. मोठा खटाटोप करून आरोपी मिळाला तरी त्याला अटक करून गुन्हा घडलेल्या पोलिस ठाण्यात घेऊन येणे व तपास करण्याची प्रक्रिया मोठी गुंतागुंतीची आहे. अशा प्रकारचे गुन्हे अनेकदा एका टोळीच्या माध्यमातून केले जातात. पण, विशेष म्हणजे ते एकमेकांच्या ओळखीचे नसतात. त्यांचा सूत्रधारदेखील भलताच व्यक्ती असतो. त्यामुळे टोळीतील एकास अटक झाली तर इतर व्यक्ती पुरावे नष्ट करून पसार होतात. 

काही गुन्ह्यांत भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) नुसार गुन्हा सिद्ध होतो. मात्र, सबळ पुराव्याअभावी किंवा आरोपीच सापडला नाही तर, सायबर कायद्यानुसार गुन्हा सिद्ध करण्यास पोलिसांना अपयश येथे. त्याचाच फायदा गुन्हेगारांना होतो. त्यामुळे ते सायबर गुन्ह्यातून निर्दोष सुटतात. अन्यथा त्यांना सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. फसवणुकीच्या रक्कमेनुसार त्यांना दंड करण्यात येतो. 

एकच सायबर कायदा हवा
परदेशातील सायबर गुन्ह्यांचे कायदे वेगळे आहेत. त्यामुळे एखादा सूत्रधार परदेशातील असेल तर त्याला अटक करून भारतात आणणे अवघड असते. या अडचणी दूर करण्यासाठी जगात एकाच प्रकारचा सायबर कायदा असावा, अशी मागणी होत आहे. तपास अधिकारी तज्ज्ञ असावा. त्याच्या पथकाकडे तपासासाठी आवश्‍यक सर्व बाबी उपलब्ध असणे गरजेचे आहे. 

‘हॅश व्हॅल्यू’कडे दुर्लक्ष 
सायबर गुन्ह्यात जप्त केलेला पुरावा सिद्ध करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. ‘हॅश व्हॅल्यू’नुसार पुरावा ग्राह्य धरला जातो. एखाद्या गुन्ह्यात पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, सीडी जप्त केल्या तर त्यांची एक ‘हॅश व्हॅल्यू’ असते. या पुराव्यांत ढवळाढवळ केल्यास त्याची ‘हॅश व्हॅल्यू’ कमी होते. पोलिस या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे गुन्ह्यांतून पुढे आले आहे. त्यामुळे पुरावे आणि गुन्हा सिद्ध करणे अवघड होत आहे.

सायबरच्या खटल्यांसाठी सायबर न्यायालय असावे. त्यातील सरकारी वकिलांना हे गुन्हा चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे. फसवणुकीनंतर नागरिकांनी त्वरित तक्रार करावी. उशिरा गुन्हा दाखल झाल्यास आरोपींना पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळतो. तसेच संबंधित रक्कम कुठे गेली, याची माहिती घेत येत नाही. नागरिकांनीही जागृत होणे गरजेचे आहे. सर्व बाबींची तपासणी करूनच ऑनलाइन व्यवहार करावेत.  
- रोहित माळी, वकील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber Crime Cheating Inquiry Punishment