पुणे विद्यापीठालाही सायबर हल्ल्याचा धोका

संतोष शाळिग्राम 
गुरुवार, 24 मे 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगणक यंत्रणेवरही सायबर हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वीच स्पॅम मेलद्वारे हे हल्ले करून नंतर विद्यापीठाच्या नावाने असंख्य शिक्षणबाह्य मेल पाठविण्यात आल्या होत्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने हल्ले रोखणारी यंत्रणा अधिक सक्षम केली.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगणक यंत्रणेवरही सायबर हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वीच स्पॅम मेलद्वारे हे हल्ले करून नंतर विद्यापीठाच्या नावाने असंख्य शिक्षणबाह्य मेल पाठविण्यात आल्या होत्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने हल्ले रोखणारी यंत्रणा अधिक सक्षम केली.

पुण्यात विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचा पेपर फुटला. दोन आठवड्यांपूर्वी नाशिक येथे तर विद्यापीठाचे ई-मेल अकाउंट हॅक करून प्रश्‍नपत्रिका फोडण्यात आली होती. या घटनांचा मागोवा घेतला असता, विद्यापीठाच्या संगणक नियंत्रण कक्षावर सायबर हल्ल्याचा विषय समोर आला. असंख्य स्पॅम मेल पाठवून विद्यापीठाची यंत्रणा कोलमडून टाकणे आणि यंत्रणेकडील ई-मेलचा गैरवापर करण्याचा हेतू हल्ल्यांमागे होता. या हल्ल्यांसाठी चीन वा वेगवेगळ्या देशांतील सर्व्हरचा वापर केला जातो.

विद्यापीठाच्या संगणक नियंत्रण यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी विद्यापीठाला काही स्पॅम मेल आल्या होत्या. "त्यात तुमच्या ई मेल अकाउंटवरील स्टोअरेज संपले असून, ते वाढवून घेण्यासाठी संबंधित लिंकवर क्‍लिक करा' असे सांगितले होते. क्‍लिक केल्यानंतर अकाउंटची माहिती हॅकरपर्यंत पोचली आणि विद्यापीठाच्या अकाउंटवरून बनावट मेल पाठविल्या गेल्या होत्या.

काही तासांत एवढ्या प्रचंड मेल कशा पाठविल्या गेल्या हे तपासल्यानंतर या सायबर हल्ल्याची कल्पना आली. त्यानंतर सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना "स्पॅम मेल'ला बळी पडू नये, असे संदेश पाठविले. तसेच, अनेक संशयास्पद "आयपी ऍड्रेस' प्रतिबंधित केलेले आहेत. आता "फायरवॉल' सक्षम केल्याने असे मेल आले, तरी त्याचा धोका किंवा संकेतस्थळ हॅक होण्याचाही धोका नसल्याचे या सूत्रांनी सांगितले.

नाशिक येथे पेपर फोडण्यासाठी विद्यापीठाचे ई-मेल हॅक केलेले होते. त्यासाठी संगणक नियंत्रण यंत्रणा सुरक्षित करण्यात येत आहेत. स्पॅम मेल वा फिशिंग करून गैरप्रकार होणार नाही, यासाठी फायरवॉल मजबूत केल्या आहेत. त्यासाठी सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांची मदत घेतली आहे. त्यामुळे आता सायबर हल्ल्याचा धोका राहिलेला नाही.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: cyber crime danger for pune university