# CyberCrime ‘डर्टी सिक्रेट्‌स’ बनलेय ब्लॅकमेलिंगचे नवे हत्‍यार

सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुणे - नामांकित आयटी कंपनीत काम करणारा अमित (नाव बदलले आहे) त्याच्या मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. त्यास अचानक एक ई-मेल आला. त्यामध्ये ‘तुमचे ‘डर्टी सिक्रेट’ सोशल मीडियावर पसरवून बदनामी करू का?’ अशी धमकी दिली जाते. त्यामुळे घाबरून अमितने त्या ई-मेलला प्रतिसाद दिला अन्‌ त्यानंतर हळूहळू सायबर गुन्हेगारी टोळीने त्याला आपले ‘सावज’ बनवून पैसे मागण्यास सुरवात केली.

पुणे - नामांकित आयटी कंपनीत काम करणारा अमित (नाव बदलले आहे) त्याच्या मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. त्यास अचानक एक ई-मेल आला. त्यामध्ये ‘तुमचे ‘डर्टी सिक्रेट’ सोशल मीडियावर पसरवून बदनामी करू का?’ अशी धमकी दिली जाते. त्यामुळे घाबरून अमितने त्या ई-मेलला प्रतिसाद दिला अन्‌ त्यानंतर हळूहळू सायबर गुन्हेगारी टोळीने त्याला आपले ‘सावज’ बनवून पैसे मागण्यास सुरवात केली.

तर एका कंपनीमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबतची माहिती चव्हाट्यावर आणण्याची भीती दाखवून संबंधित कंपनीलाही ‘ब्लॅकमेल’ केले जाते. या आणि अशा स्वरूपाच्या २० ते २२ तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. प्रत्यक्षात अशा फसवणुकीचे असंख्य प्रकार घडत असल्याची शक्‍यता आहे. 

अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मोबाईल आणि अतिजलद इंटरनेट सेवेमुळे आंबटशौकीन त्यांची आवड जोपासत असतात. त्यादृष्टीने जगभरात लाखो वेबसाइट्‌सची निर्मिती होऊन त्याकडे आंबटशौकिनांना आकर्षित केले जात आहे, तर दुसरीकडे कॉर्पोरेट कंपन्यांपासून अनेक महत्त्वाची कार्यालये, संस्थांकडून वेगवेगळ्या प्रकारची गोपनीय माहिती किंवा आर्थिक व्यवहाराची इंटरनेटद्वारे आदानप्रदान सुरू असते. त्यामध्येही काही प्रमाणात गैरप्रकार केले जातात. या स्वरूपाचे आपले ‘डर्टी सिक्रेट्‌स’ जगासमोर उघड होऊ नये, यादृष्टीने संबंधित व्यक्ती, कंपन्यांकडून पुरेपूर काळजी घेतली जाते. मात्र जे काळजी घेत नाहीत, त्यांची फसवणूक होते.

पैसे उकळण्यावर भर
अल्पवयीन मुले, तरुण व काही ६० वर्षांच्यावरील नागरिक सायबर गुन्हेगारांचे ‘टार्गेट’ ठरत आहेत. त्यामध्ये तरुण व वृद्धांकडून अधिकाधिक पैसे उकळण्यावर भर दिला जातो.

लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्याने माझ्यासारखे हजारो तरुण गुपचूप पॉर्न फिल्म पाहतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांकडून ब्लॅकमेल केले जाऊ शकते. 
- निमिष

...अशी घ्या काळजी !
 अनोळखी ई-मेल, मेसेजला प्रतिसाद देऊ नका
 मोबाईलवर आलेली अनोळखी लिंक उघडू नका 
 बदनामीच्या भीतीने आर्थिक व्यवहार करू नका
 संशयास्पद ई-मेल, मेसेजविषयी पोलिसांशी संपर्क साधा

बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी 
या स्वरूपातील सावज ठरलेल्या व्यक्तीकडून काही सायबर गुन्हेगार बॅंकांमार्फत पैसे मागतात. मात्र काही सायबर गुन्हेगारांनी त्यापुढे पाऊल टाकले आहे. काही मोठ्या व्यक्ती किंवा नामांकित कंपन्यांकडे थेट बिटकॉईन या आभासी चलनाद्वारे खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सायबर गुन्हेगार दररोज हजारो जणांना ‘डर्टी सिक्रेट्‌स’बाबतचे ई-मेल पाठवीत असतात. त्यामध्ये पॉर्न फिल्म पाहणारे काही नागरिक किंवा गोपनीय व्यवहार करणाऱ्या कंपन्यांमधील काही जण फक्त सायबर गुन्हेगारांच्या ई-मेलला प्रतिसाद देतात. त्यानंतर त्यांची फसवणूक होण्याची शक्‍यता वाढते. 
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा