सायबर गुन्हेगारांना शिक्षा देण्यात महाराष्ट्र पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

उत्तर प्रदेश प्रथम; छत्तीसगड, तेलंगणातही शिक्षेचे प्रमाण चांगले 

पिंपरी - देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना असे गुन्हे करणाऱ्या आरोपींना शिक्षा देण्यात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असताना दुसरीकडे महाराष्ट्र मात्र थेट पंधराव्या क्रमांकावर फेकला गेल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. 

उत्तर प्रदेश प्रथम; छत्तीसगड, तेलंगणातही शिक्षेचे प्रमाण चांगले 

पिंपरी - देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना असे गुन्हे करणाऱ्या आरोपींना शिक्षा देण्यात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असताना दुसरीकडे महाराष्ट्र मात्र थेट पंधराव्या क्रमांकावर फेकला गेल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. 

२०१५ मध्ये सायबर गुन्ह्यातील १२० आरोपींना उत्तर प्रदेशात शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, महाराष्ट्रात हे प्रमाण बोटावर मोजण्याइतकेच आहे. राज्यात २०१४ मध्ये फक्त तिघाजणांना आणि २०१५ मध्ये सायबर गुन्ह्यातील केवळ एका आरोपीला शिक्षा देण्यात आली. २०१४-१५ या वर्षात राज्यात तब्बल चार हजार ४७ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्रात सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. संपूर्ण देशात राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यात होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचा विचार करता, सायबर गुन्हे करणाऱ्या आरोपींना शिक्षा देण्याचे प्रमाण फारच अल्प असल्याचे मत सायबर तज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी नोंदवले आहे. 

उत्तर प्रदेश खालोखाल अन्य राज्यांमधे सायबर गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे प्रमाण चांगले आहे. २०१५मधे छत्तीसगडमधे २९, तेलंगणात २६, पंजाबमधे २५, मध्य प्रदेशात २०, केरळमधे १७ आणि राजस्थानमधे १३ जणांना सायबर गुन्हे केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या सायबर गुन्ह्यांमधे बॅंकिंगसंदर्भात ऑनलाइन फसवणूक, माहितीची चोरी करणे, सोर्स कोड मॉडिफिकेशन आदी प्रकारांचा समावेश आहे. सायबर गुन्हांचा तपास करण्याचा वेग उत्तर प्रदेशात जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आरोपींना शिक्षा देण्याचा वेग चांगला आहे.

सायबर गुन्हांचा तपास करण्यात राज्य पोलिस पुढे असले तरी या ठिकाणी असणाऱ्या तंत्रज्ञानात थोड्या त्रुटी आहेत. बऱ्याचदा अशा गुन्ह्यांसाठी आवश्‍यक असणारे फोरेन्सिक लॅबचे अहवाल येण्यास खूप उशीर होतो, त्यामुळे केसेस रेंगाळतात. पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या शिपायापासून ते पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना सायबर शिक्षण सक्‍तीचे केल्यास राज्यात सायबर गुन्हाचा तपास होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. देशात गेल्या दहा वर्षांत झालेले सायबर गुन्हे आणि त्यामधे अटक झालेल्या आरोपींची आकडेवारी 

वर्ष                      सायबर गुन्ह्यांची संख्या               अटक आरोपींचा आकडा 

२००६                      ४५३                                     ५६५
२००७                      ५५६                                     ५८३
२००८                      ४६४                                     ३७३
२००९                      ६९६                                     ५५१
२०१०                     १३२२                                   ११९३
२०११                     २२१३                                   १६३०
२०१२                     ३४७७                                   २०७१
२०१३                     ५६९३                                    ३३०१
२०१४                     ९६२२                                    ५७५२
२०१५                    ११५९२                                    ८१२१
 
गेल्या वर्षी देशात झालेल्या ११ हजार ५९२ सायबर गुन्ह्यांपैकी तीन हजार ८५५ गुन्हे बॅंकिंग व्यवहाराशी संबंधित असून हे प्रमाण २५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे.

Web Title: Cyber criminals sentenced trailing Maharashtra