सायबर सुरक्षा क्षेत्रात भरारी

सायबर सुरक्षा क्षेत्रात भरारी

बेताच्या आर्थिक स्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून अँटिव्हायरस आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील पहिली भारतीय कंपनी स्थापणाऱ्या कैलास आणि संजय काटकर यांची यशोगाथा अनेक नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘व्हायरस’ काय असतो, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी खटपट करावी लागली. अशा विपरित परिस्थितीतून मार्ग काढत आज ‘क्विकहिल’ ही पुण्याची कंपनी जागतिक ब्रॅंड झाली आहे. 

‘क्‍वि कहिल’ची मुहूर्तमेढ २१ वर्षांपूर्वी रोवली गेली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कैलास काटकर इलेक्‍ट्रॉनिक वस्तू दुरुस्तीची कामे करत आणि संजय काटकर पुणे विद्यापीठाने नव्यानेच सुरू केलेला बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स (बीसीएस) अभ्यासक्रम शिकत होते.

महाविद्यालयामध्ये ‘प्रॅक्‍टिकल’ करत असताना संजय यांचा पहिला ‘एन्काउंटर’ व्हायरसबरोबर झाला. प्रयोगशाळेतील बंद पडलेले संगणक कशामुळे नेमके बिघडत आहेत, हे शोधण्याच्या उत्सुकतेपोटी ‘अँटिव्हायरस प्रोग्रॅम टूल्स’ त्यांनी विकसित केले. त्या वेळी व्हायरस या विषयावर ना पुस्तके होती ना आणखी कोणी मार्गदर्शक व्यक्ती. पुण्यात बड्या आयटी कंपन्या आल्यामुळे आयटी प्रोफेशनल्सला खूप मागणी होती. त्याच काळात नवा व्हायरस आला, की त्यावर ‘उतारा’ शोधण्याचे काम संजय करीत. हा उतारा लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले कैलास यांनी. 

पहिले ‘व्हर्जन’
पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९५ मध्ये ‘क्विकहिल’ नावाने डॉस ऑपरेटिंग सिस्टिमसाठी पहिले व्हर्जन डेव्हलप केले. ‘अँटिव्हायरस’ ही संकल्पना आईला समजावून सांगणेसुद्धा संजय आणि कैलास यांना अवघड जात असे. यावरून त्या काळी सर्वसामान्य लोकांमध्ये याबाबत कितपत जागृती असेल याची कल्पनाच केलेली बरी. संगणक विकत घेतल्यावर त्यातील सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी लोक खर्च करत नव्हते, तिथे ‘सिक्‍युरिटी’वर कोणी खर्च करेल? दुसरीकडे बॅंकांकडून कर्ज मिळत नव्हते आणि गुंतवणूकदार नव्हते. अशा कठीण परिस्थितीत संजय आणि कैलास यांनी संगणक विक्रेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. हार्डवेअर बरोबर सॉफ्टवेअर विकायला शिकविले. संगणक बिघडण्याची लक्षणे सांगून ते प्रकार ‘व्हायरस’मुळे होताहेत, असे सांगून विश्‍वास संपादन केला. अशाप्रकारे तीन वर्षांत ‘क्विकहिल’ने ‘ब्रॅंड’ म्हणून ओळख निर्माण केली. 

आव्हाने 
दररोज नव्या स्वरूपातील व्हायरस येत असल्यामुळे त्यांच्यावर मात करण्यासाठी नवे प्रोग्रॅम आणि टूल्स विकसित करण्यासाठी खर्च करावा लागायचा. इंटरनेटचा वापर घरोघरी जसा वाढायला लागला तसे व्हायरसचे हल्लेही वाढले. पूर्वी वर्षाला एखादा व्हायरस येत असे, त्याजागी दिवसाला एक व्हायरस यायला लागला. प्रशिक्षित, कुशल सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची आवश्‍यकता संजय यांना भासू लागली. ‘क्विकहिल’ कंपनी नवीन, साहजिकच त्यांच्याकडून देऊ केला जाणारा पगारही कमी. त्यामुळे हुशार विद्यार्थी येत नव्हते आणि आले तरी वर्षभरातच सोडून जायचे. त्या वेळी नैराश्‍याने मनात घर केले. त्याचवेळी जागतिक पातळीवरील ‘कॉम्प्लेक्‍स व्हायरस’ हे आव्हान म्हणून डोळ्यासमोर असत आणि त्यांच्यावर मात करण्याची जिद्द मनात होती. त्यात यश मिळाले आणि बड्या कंपन्यांच्या तुलनेत आम्ही विजेच्या वेगाने लोकांना अँटिव्हायरस सोल्यूशन देत गेलो. त्यामुळे ‘टेक्‍निकली साउंड प्रोडक्‍ट’ म्हणून ‘क्विकहिल’ प्रस्थापित झाली, असे ते सांगतात.  

विस्तार 
पुणेकरांच्या विश्‍वास संपादनानंतर ‘क्विकहिल’ने २००१-०२ मध्ये पहिले ‘ब्रॅंच ऑफिस’ नाशिकला सुरू केले. तिथेही ‘पुणे मॉडेल’ यशस्वीपणे राबविले. आज श्रीनगरपासून कोचीनपर्यंत ‘क्विकहिल’ची ३५ ब्रॅंच ऑफिस आणि जागतिक पातळीवर अमेरिका, जपान, दुबई आणि केनिया या देशांमध्ये कार्यालये आहेत. सर्व कार्यालयांमध्ये प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ आहे. अँटिव्हायरस क्षेत्रातील पहिले वहिले संशोधन केंद्र पुण्यात, तर टेक्‍नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर नाशिकमध्ये स्थापन केले. अँटिव्हायरस बाजारपेठेतील ३० टक्के वाटा ‘क्विकहिल’ने काबीज केलाय. कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने चाललेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आता ‘क्विकहिल’कडून सुरक्षित सायबर व्यवहारांबाबत उत्पादन विकसित केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com