'सायबर योद्धा' बनून काम करा - भाजप अध्यक्ष अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पुणे - सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा संदेश, विचार आणि प्रसार माध्यमांतील पक्षविरोधी खोट्या बातम्यांमागील तथ्य तळागाळात पोचविण्यासाठी संकल्प, संघटन आणि नियोजनबद्ध संवादासह "सायबर योद्धा' बनून काम करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केले.

पुणे - सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा संदेश, विचार आणि प्रसार माध्यमांतील पक्षविरोधी खोट्या बातम्यांमागील तथ्य तळागाळात पोचविण्यासाठी संकल्प, संघटन आणि नियोजनबद्ध संवादासह "सायबर योद्धा' बनून काम करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे "महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेल'च्या स्वयंसेवकांशी संवाद कार्यक्रमात शहा बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर मुक्ता टिळक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, संघटनप्रमुख व्ही. सतीश, भाजप आयटी व सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित मालवीय, खासदार अनिल शिरोळे, पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी पदाधिकारी उपस्थित होते. येथे प्रसिद्धिमाध्यमांना प्रवेश नव्हता.

शहा म्हणाले, 'सोशल मीडिया प्रचार यंत्रणा मनोरंजनासाठी नव्हे तर परिणाम घडविण्यासाठी आहे. ती सक्षम करण्यासाठी अधिकृत संशोधनात्मक माहिती, आकडेवारी आवश्‍यक आहे. तुलनात्मक विश्‍लेषण करून हल्ल्याला प्रतिहल्ला करणे, सतत जागृत राहून वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावरील पक्ष व सरकारविरोधी "व्हायरल' बातम्यांना योजनाबद्ध प्रत्युत्तर द्यावे लागेल. उत्साह, शिस्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना आकर्षित करणारा मजकूर प्रसारित केला पाहिजे. परंतु केवळ सोशल मीडियावर विसंबून न राहता व्यक्ती, गाव, जिल्हा, शहर ते केंद्रापर्यंत माहिती पोचण्यासाठी घामही गाळावा लागेल. "पंचायत ते पार्लमेंट'पर्यंत भाजपची सत्ता कायम राहण्यासाठी सोशल मीडियाने बूथनिहाय स्मार्टफोन स्वयंसेवक तयार केले पाहिजेत.''

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
- सोशल मीडियाचे स्वयंसेवक ही भाजपची मुख्य सेना
- 2019 ची लोकसभा सोशल मीडियातूनच जिंकावी लागेल
- कॉंग्रेसकडून सोशल मीडियाचा दुरुपयोग
- खोट्या आरोपांची मालिका "व्हायरल' करून बदनामी

दानवे म्हणाले...
- निवडणुकांच्या प्रचारासाठी वर्तमानपत्रांऐवजी सोशल मीडिया प्रभावी
- विचारांवरील हल्ल्यावर सायबरद्वारे प्रतिहल्ला करणे ही काळाची गरज

'पुढील 50 वर्षे भाजपचीच सत्ता'
'भाड्याचे टट्टू "चेतक' घोड्याचा पराभव करू शकत नाहीत. आगामी 2019 लोकसभेतदेखील भाजपची सत्ता येऊन, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. देशातील सर्वपक्षीय राज्यस्तरावरील पराभूत नेते एकत्र आले तरीही फरक पडणार नाही. पुढची पन्नास वर्षे भाजपची सत्ता राहील. सत्तर वर्षात कॉंग्रेसने केलेली घाण साडेचार वर्ष साफ करतोय,'' अशी टीकादेखील राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांनी या वेळी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyber social media amit shaha