सायकल योजना पंक्‍चर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

‘पीईडीएल’ची योजनेतून माघार 
योजनेतील सायकलींना ‘ट्रॅकिंग’ यंत्रणा बसविल्याने सायकली सुरक्षित राहतील, असा दावा करण्यात आला होता. दीड-दोन महिने होताच सायकलींमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या काही दिवसांत शंभरहून अधिक सायकलींचा हिशेब लागलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘पीईडीएल’ कंपनीने तांत्रिक कारणे दाखवून योजनेतून माघार घेतली आहे.

पुणे - शहरात सायकल योजनेची अंमलबजावणी होऊन वर्ष सरत आले आहे. या काळात सायकलींची संख्या वाढविणे तर दूरच; त्यांच्या दुरुस्तीचीही यंत्रणा महापालिकेने उभारली नाही. गेल्या काही महिन्यांत गहाळ झालेल्या पाचशे सायकलींचाही शोध लागलेला नाही. यामुळे गाजावाजा करून राबविलेली सायकल योजना फसली आहे. महापालिका प्रशासन मात्र ती सुरू असल्याचा दावा करीत आहे.

पुणेकरांना सहजरीत्या सायकल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिका आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने (पीएसडीसी) ही योजना राबविली. त्यातून भाडेतत्त्वावर सायकल पुरविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी शहरातील रस्त्यांच्या लांबीच्या निम्मे म्हणजे ८२४ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, एक लाख सायकली उपलब्ध करून देण्याचे धोरण महापालिकेने तयार केले. त्यासाठी स्वतंत्र सायकल आराखडा तयार करून सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात आली. 

सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर खासगी कंपनीकडून मोफत सायकल मिळविण्यात आल्या. यात तीन कंपन्यांनी पहिल्याच टप्प्यात साडेपाच हजार सायकली पुरविल्या. यात ‘पीईडीएल’चा वाटा सर्वाधिक होता. या योजनेच्या उद्‌घाटनानंतर दोन-चार महिने सायकली धावल्या. यानंतर मात्र, सायकलींमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगत महापालिकेने सायकल धोरणापासून लांब राहणे पसंत केले. या योजनेतील निम्म्याहून अधिक सायकली बंद पडल्याची कबुली प्रशासनानेच सर्वसाधारण सभेत दिली होती.

सायकल योजना सुरू असून, मागणीच्या तुलनेत पुरेशा सायकल आहेत. काही कंपन्यांनी माघार घेतली असून, त्याऐवजी अन्य कंपन्यांनी जादा सायकल पुरविल्या आहेत. 
- नरेंद्र साळुंके, कार्यकारी अभियंता, महापालिका 

Web Title: Cycle Scheme Issue Municipal