सायकलचोरीमुळे आयटीयन्स हैराण

निगडी प्राधिकरण - सायकलप्रेमी शैलेश भिडे यांची चोरीला गेलेली सायकल.
निगडी प्राधिकरण - सायकलप्रेमी शैलेश भिडे यांची चोरीला गेलेली सायकल.

पिंपरी - शहर परिसरात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच इंधन वाचवा- पर्यावरण वाचवा असा संदेश देण्याच्या दृष्टीने आयटीयन्ससह इतर सायकलप्रेमी नागरिकांत सायकलींचा वापर वाढत असतानाच हजारो रुपये किमतीच्या विदेशी बनावटीच्या सायकली चोरीला जात असल्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे सायकलप्रेमी नागरिक विशेषतः ‘आयटीयन्स’ पुरते हैराण झाले आहेत. 

हिंजवडी, तळवडे आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या ‘आयटीयन्स’ची संख्या मोठी आहे. हिंजवडीबरोबरच पिंपळे सौदागर, निगडी प्राधिकरण, आकुर्डी, काळेवाडी- रहाटणी या भागांत हे ‘आयटीयन्स’ स्थायिक झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून इन्फोसिस, कॉग्निझंट, पर्सिसटंट, सिंटेल, डॅसॉल्ट सिस्टीम, सिमेन्स, विप्रो आदी आयटी कंपन्यांमधील अधिकारी- कर्मचारीवर्ग व्यायाम आणि घर ते ऑफिस यासाठी सायकलींचा वापर करीत आहेत. बहुतेक सायकलप्रेमींकडून विदेशी बनावटीच्या सायकलींना पसंती आहे. त्यांच्या किंमती १५ हजारांपासून ८० ते ९० हजार रुपये आहेत, त्यामुळे चोरट्यांची वक्रदृष्टी सायकलींकडे वळली आहे. 

सायकलप्रेमी शैलेश भिडे म्हणाले, ‘‘आठ महिन्यांपूर्वी तीस हजार रुपये किमतीची फोकस नावाची विदेशी बनावटीची सायकल घेतली होती. माझ्याकडे यापूर्वीची १५ हजार रुपये किमतीची फायरफॉक्‍स कंपनीची सायकल होती. या दोन्ही सायकली पहाटे घराच्या आवारातून कुलूप तोडून चोरीस गेल्या. त्याबाबत आवश्‍यक कागदपत्रांसह निगडी पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली; परंतु चोरटे अजून सापडले नाहीत.’’

सायकलप्रेमी धनंजय शेडबाळे म्हणाले, ‘‘निगडी प्राधिकरण, पिंपळे सौदागर, काळेवाडी- रहाटणी, निगडी, आकुर्डी येथे सायकलचोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. माझी ‘ट्रॅक’ या कंपनीची ४० हजार रुपये किमतीची सायकल चोरीला गेली आहे. चोरीचे तीन ‘सीसीटीव्ही फुटेज’ पोलिसांना दिले आहेत; परंतु त्यांच्यात निष्काळजीपणा जास्त दिसून येत आहे.’’

याबाबत इंडो ॲथलेटिक क्लबचे अध्यक्ष गजानन खैरे म्हणाले, ‘‘विदेशी बनावटींच्या सायकली वजनाला हलक्‍या असतात. त्यांचे वजन अवघे १४ ते १५ किलो असते. त्यांच्या किमतीही हजारो रुपये असतात. त्यामुळे सायकलचोरीचे प्रमाण वाढले आहे. आम्ही पोलिसांना निवेदन देणार आहोत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com