भुरट्या चोरांची नजर सायकलींवर

Crime
Crime

पुणे - शहरात वाहनांची संख्या बेसुमार वाढल्याने पार्किंगचा प्रश्‍न गंभीर झाला असताना पुणेकरांचा पुन्हा सायकल वापरण्याचा कल वाढत आहे. शाळकरी मुलांसह हौशी सायकलस्वार महागडी सायकल घेत आहेत. काही जण जवळच्या ठिकाणी जायचे असेल, तर सायकलचा वापर करत आहेत. मात्र, सायकल चोरीला जात असल्याने डोकेदुखी वाढली आहे.  

पुण्यात सध्या सायकल वापरणाऱ्यांची संख्या दीड ते दोन लाख आहे. यात शाळकरी मुलांची संख्या मोठी आहे. काही वर्षांपासून तंदुरुस्तीसाठी सायकल चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारात अनेक ब्रॅंडच्या सायकली आल्याने शाळकरी मुलांसह हौशी सायकलस्वारांकडून महागड्या सायकली विकत घेतल्या जात आहेत. 

खासगी शिकवणी, शाळांच्या बाहेर रस्त्यावर लावलेल्या किंवा सोसायटीच्या पार्किंगमधून सायकल चोरल्या जात आहेत. कोथरूड, एरंडवणे भागात सायकल चोरी करणारा सराईत ज्ञानू उर्फ बापू भगवान शिंदे, गोवर्धन ललवा साहू या दोघांना  गेल्या वर्षी अलंकार पोलिसांनी अटक केली होती. दोघांकडून प्रत्येकी २३ सायकली जप्त केल्या होत्या. या गुन्ह्यात त्याला शिक्षाही झाली. सायकल चोरी करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांसह, भुरटे चोरटे आहेत. 

पुण्यात अनेक सायकली चोरीला जात आहेत, पण नागरिक त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यास टाळाटाळ करत असल्याने या गुन्ह्यांची संख्या कमी दिसत आहे.    

‘स्मार्ट’ सायकलची तोडफोड
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत भाडेतत्त्वावर सायकल देण्यासाठी खासगी कपन्यांनी शहरात सायकली आणल्या. जीपीएस सिस्टीम, ऑनलाइन पैसे देण्याची सुविधा अशा तंत्रज्ञानाचा यात वापर करण्यात आल्याने त्यांची चोरी होऊ शकत नव्हती. मात्र काही उपद्रवी नागरिकांनी सायकलचे कुलूप तोडून या सायकली वापरण्यास सुरवात केली. 

या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली होती. असे अनेक प्रकार गेल्या काही काळात घडले. सायकल वापरण्यापेक्षा त्यांचे नुकसानच जास्त होत असल्याने काही कंपन्यांनी पुण्यातून काढता पाय घेतला आहे.

शहरातील सायकल चोरी
वर्ष         दाखल गुन्हे    उघडकीस आलेले गुन्हे 

२०१७           ३९                      ११       
२०१८           ४७                      १५  

पुण्यात सायकल चोरी करणारी खास अशी टोळी नाही. जे चोऱ्या करतात; त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांनी सायकल चोरी होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी.  
- शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com