सिलिंडरचा काळाबाजार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे - भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या घरगुती सिलिंडरचा शहरात गेल्या महिनाभरापासून तुटवडा आहे. काळ्या बाजारात सिलिंडर मिळतो, पण अधिकृत नोंदणी करून मिळत नसल्याने ही कृत्रिम टंचाई असल्याचा आरोप काही नागरिक करीत आहेत. येत्या दोन दिवसांत सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती पेट्रोलियम कंपन्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ऑनलाइन बुकिंगनंतरही शहर आणि उपनगरात सिलिंडरचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, सिलिंडरसाठी पंधरा दिवसांपासून महिनाभरापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

पुणे - भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या घरगुती सिलिंडरचा शहरात गेल्या महिनाभरापासून तुटवडा आहे. काळ्या बाजारात सिलिंडर मिळतो, पण अधिकृत नोंदणी करून मिळत नसल्याने ही कृत्रिम टंचाई असल्याचा आरोप काही नागरिक करीत आहेत. येत्या दोन दिवसांत सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती पेट्रोलियम कंपन्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ऑनलाइन बुकिंगनंतरही शहर आणि उपनगरात सिलिंडरचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, सिलिंडरसाठी पंधरा दिवसांपासून महिनाभरापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

वितरकांकडेच घरगुती सिलिंडरची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे बुकिंगनंतर आठ दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. दरम्यान, हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

दोन दिवसांत सेवा पूर्ववत
शहर आणि उपनगरांमध्ये महिनाभरापासून गॅस सिलिंडरची टंचाई
भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या सिलिंडरचा पुरवठा विस्कळित
कंपन्यांकडून सिलिंडर मिळत नसल्याची वितरकांची माहिती
काळ्या बाजारात सिलिंडर मिळतो, बुकिंग करून मिळत नसल्याच्या तक्रारी
येत्या दोन दिवसांत सेवा पूर्ववत करण्याचा कंपन्यांचा दावा

गेल्या आठ दिवसांपूर्वी ऑनलाइन बुक करूनही अद्याप सिलिंडर मिळालेला नाही. वितरकांकडे चौकशी केली असता कंपनीकडूनच गाड्या येत नसल्याची कारणे दिली जात आहेत. काळ्या बाजारात सिलिंडर अर्ध्या तासात मिळत आहे. परंतु, अधिकृत नोंदणी करूनही सिलिंडर मिळत नाही, त्यामुळे सिलिंडरचा जाणीवपूर्वक तुटवडा केला जात आहे, याबद्दल शंका येते.

- मीरा केदारी, गृहिणी 

गेल्या आठ दिवसांपासून भारत गॅसचे वितरण विस्कळित झाले आहे. गेल्या आठवड्यात समुद्रमार्गे येणारे एक जहाज भारतात उशिरा आल्यामुळे आमच्या शिक्रापूर प्रकल्पामध्ये पुरवठा झालेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये ही तफावत आम्ही भरून काढू. गॅस वितरणाची सेवा तातडीने पूर्ववत केली जाईल.
- संदीप पवार, विक्री व्यवस्थापक, भारत पेट्रोलियम

भारत गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. त्याला कारण की आमच्या शिक्रापूर येथील प्रकल्पांमध्ये रिफायनरीसाठीचा पुरवठा संपला होता. परंतु, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये युद्धपातळीवर प्रकल्पामध्ये सिलिंडर भरून वितरित केले जातील. त्यासाठी रविवारीदेखील शिक्रापूर येथील प्रकल्प सुरू ठेवणार आहोत. 
- पवन कुमार, प्रादेशिक व्यवस्थापक, भारत पेट्रोलियम

शहरामध्ये गॅस सिलिंडर मागणीनुसार पुरवठा करणे हे ज्या त्या पेट्रोलियम कंपन्यांचे काम आहे. शहर अन्नधान्य वितरण विभागाचे काम केवळ त्यामध्ये गैरप्रकार व गैरवापर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणे हे आहे. तुटवडा असल्याच्या तक्रारी आल्यास समन्वयाचे काम आम्ही करतो. 
- शहाजी पवार, अन्न व धान्य पुरवठा अधिकारी 

कंपनीकडूनच पुरवठा नाही

शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या एका वितरकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘‘बुकिंग करूनदेखील गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारीत सत्यता आहे. कारण भारत पेट्रोलियम कंपन्यांकडून गेल्या आठवडाभरात गाड्या आलेल्या नाहीत त्यामुळे तुटवडा आहे. आम्हीसुद्धा त्या संदर्भात कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सेवा पूर्ववत होईल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. काळ्याबाजारात सहज सिलिंडर मिळत असल्याच्या तक्रारींची शहानिशा केली जाईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cylinder black market