दिवाळीनंतरही वेळेत मिळेना सिलिंडर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

- तुटवडा नाही मात्र वितरणात विस्कळितपणा

पुणे : दिवाळीच्या काही दिवस आधीपासून शहरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात विस्कळितपणा निर्माण झाला आहे. तो दिवाळीनंतर देखील कायम आहे. बुक केल्यानंतर पाच ते दहा दिवसांनी सिलिंडर मिळत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे वितरकांकडून सांगण्यात येत असले, तरी पुरवठ्यात विस्कळितपणा आल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.

शहरात हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत गॅस आणि इंडियन ऑइल कंपनीकडून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा
केला जातो. शहराच्या विविध भागात गॅसधारकांना सिलिंडर मिळण्यासाठी किमान एका आठवड्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. दिवाळीपुर्वी ग्राहकांना बुकिंगनंतर दोन ते तीन दिवसांत सिलिंडर मिळत होता. मात्र, आता तो कालावधी वाढल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. याबाबत काही गॅस सिलिंडर वितरकांकडे चौकशी केली असता सिंलिंडरचा तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले. सिलिंडरचे वितरण करणारे कर्मचारी दिवाळीसाठी सुटीवर गेल्यामुळे ग्राहकांना डिलिव्हरी वेळेवर होत नसल्याचे समजते.

वितरक अमोल डांगले म्हणाले, "गेल्या महिन्यात गॅसचा पुरवठा विस्कळित झाल्या होता. मात्र सध्या पुरेसा साठा उपलब्ध आहे. बुकिंग केल्यानंतर तीन दिवसांत डिलिव्हरी देखील होते. मात्र बुकिंग केल्यानंतर संबंधित व्यक्ती घरी नसेल किंवा काही तांत्रिक समस्या आली तर सिलिंडर देण्यास उशीर होतो.

मी 26 ऑक्‍टोबरला बुकींग केल्यानंतर 30 ऑक्‍टोबरला सिलिंडर मिळेल, असा एसएमएस आला होता. मात्र, अद्याप मला डिलिव्हरी मिळाली नाही. आठ दिवस उलटल्यावरही गॅस मिळत नसल्याने मोठी गैरसोय झाली आहे.

- सुनीता कुलकर्णी, गृहिणी, मार्केटयार्ड

शहरातील वितरकांकडे सध्या सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र ग्राहकांना वेळेत सिलिंडर मिळत नसेल, तर त्याबाबत चौकशी केली जाईल.

- अंजली भावे, उपमहाव्यवस्थापक, कार्पोरेट कम्युनिकेशन, इंडियन ऑईल कंपनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cylinder not getting On Time in Pune