जेव्हा रंगते विनोदाची जुगलबंदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नव्वद वर्षांचे आयुष्य पाहिल्यानंतर एक कळाले. ते म्हणजे या जीवनात दु:ख फार आहे. यातून कोणाची सुटका नाही. विनोदामुळेही दु:ख नाहीसे होत नाही; पण किमान आपण दु:ख काही वेळ विसरू तरी शकतो.
- द. मा. मिरासदार, साहित्यिक

पुणे - ‘‘मी केवळ वयाने मोठा आहे इतकेच. खरे मोठेपण तर प्रा. द. मा. मिरासदार यांनी आपल्या विनोदी लेखनातून मिळवले,’’ असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते. त्यांचे हे वाक्‍य संपताच ‘तुमचा हा फारच विनय झाला’, अशी कोटी मिरासदारांनी आपल्या खास शैलीत केली आणि अख्खे सभागृह हास्यात बुडाले. दोघांनीही एकामागून एक असे विनोदी प्रसंग श्रोत्यांना सांगितल्याने ही ‘विनोदाची जुगलबंदी’ अनेकांसाठी अविस्मरणीय ठरली.

केवळ साडेपाच वर्षांनी मोठे आणि अत्यंत जवळचे मित्र असलेल्या बाबासाहेबांच्या हस्ते मिरासदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. मिरासदारांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्ताने मिरासदार-मंकणी कुटुंबीय आणि विविध संस्थांच्या वतीने हा सोहळा आयोजिण्यात आला होता. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, उद्योजक कृष्णकुमार गोयल, मिरासदारांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, अभिनेते रवींद्र मंकणी, ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.

बाबासाहेब म्हणाले, ‘‘मिरासदारांच्या विनोदामुळे महाराष्ट्र खळखळून हसला. विनोदातून त्यांनी कोणाला जखम केली नाही. कोणाचे रक्त काढले नाही. दु:ख बाजूला सारण्याची ताकद विनोदात आहे. असेच लेखन मिरासदारांनी केले. त्यांची पुस्तके वाचल्यावर हे कळेल.’’ त्यांची पुस्तके वाचा म्हणतोय, म्हणजे मी काही त्यांचा पुस्तक विक्रेता किंवा एजंट नाही, अशी कोटी करत बाबासाहेबांनी पुन्हा एकदा श्रोत्यांना खळखळून हसवले. त्यांच्यानंतर मिरासदारांनी माईक घेतला आणि वेगवेगळे किस्से सांगत मैफल रंगवत नेली. या वयातही असलेल्या तल्लख स्मरणशक्तीचे दर्शन त्यांनी घडवून दिले.

जावडेकर म्हणाले, ‘‘मी केंद्रीयमंत्री म्हणून नव्हे, तर मिरासदार सरांचा विद्यार्थी म्हणून इथे आलो आहे. सरांचा तास असला की क्‍लासरूम तुडुंब भरलेली असायची. त्यांच्यामुळेच माझ्यावर मराठी भाषेचे संस्कार झाले आहेत.’’ सरकारने मिरासदारांना महाराष्ट्रभूषण देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा, अशी मागणी प्रा. जोशी यांनी केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Da Ma Mirasdar