एकाच पिस्तुलाने दाभोलकर, गौरी लंकेश यांची हत्या? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश या दोघांची हत्या एकाच पिस्तुलातून झाली आहे का, या बाबतच्या दुव्यांवर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, संशयित आरोपी सचिन अंदुरे याच्या मेहुण्याकडून काही दिवसांपूर्वी जप्त केलेल्या पिस्तुलातून या हत्या झाल्या असल्याचा संशय असला तरी, बॅलेस्टिक रिपोर्ट मिळाल्यानंतर या बाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे सीबीआयने रविवारी न्यायालयात नमूद केले. 

अंदुरे याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला आज शिवाजीनगरमधील पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. त्याची अजून चौकशी करायची आहे. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी अंदुरेच्या कोठडीत 30 ऑगस्टपर्यंत वाढ केली. अॅड. ढाकणे यांनी न्यायालयाला सांगितले, की सचिन अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल व काडतुसे औरंगाबादमधील त्याच्या मेहुण्याकडे ठेवले होते. शुभम सुरळे याने ते पिस्तूल त्याचा मित्र रोहित रेगेला दिले. औरंगाबाद पोलिसांनी हे शस्त्र ठेवून घेणाऱ्या शुभम सुरळेसह तिघांना अटक करून, त्यांच्याकडून पिस्तूल जप्त केले. या पिस्तुलाचा संबंध गौरी लंकेश हत्येशी आहे, असा संशय आहे. याबाबत बॅलेस्टिक रिपोर्ट आल्यावर त्याबद्दल अधिक तपशील सांगता येईल. 

आरोपीचे वकील अॅड. प्रकाश सालसिंगीकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, सीबीआय प्रत्येक वेळी नवीन थिअरी मांडते. आताही ते अंदुरेबाबत निष्कर्षापर्यंत पोचली आहे. याआधी मारेकरी म्हणून सारंग अकोलकर व विनय पवार यांची नावे होती. आता नवी नावे सांगितली जात आहेत. 

एकत्रित चौकशी होणार 
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकरसह आणखी काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्‍यता आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी अमित डिगवेकर, अमोल काळे व आणखी एका आरोपीची सचिन अंदुरेसोबत एकत्रित चौकशी केली जाणार आहे. दाभोलकर प्रकरणाशी गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा संबंध असून, यातील तीन आरोपींनी दाभोलकर यांच्या हत्येसाठी पुण्यात रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Dabholkar, Gauri Lankesh murdered by a single pistol?