दाभोळकर, पानसरेंनी प्रश्न विचारायला शिकविले

Dabholkar, Pansare taught to ask questions
Dabholkar, Pansare taught to ask questions

सोमेश्वरनगर : दाभोळकर, पानसरेंनी प्रश्न विचारायला शिकविले, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे व लोकांना शहाणे करण्याचे काम केले. यामुळे सनातनी संस्कृतीनुसार धर्मांधांनी त्यांना 'दुर्जन' ठरविले आणि मारायला माणसं पाठविली. वर्णव्यवस्थेची समाजरचना आणणे हे सनातनी व्यवस्थेचे ध्येय आहे. म्हणूनच हे ध्येय हाणून पाडले पाहिजे, असे परखड मत माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले.

डॅा. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेच्या वतीने 'वैज्ञानिक दृष्टीकोन दिन' साजरा करण्यात आला. यानिमित्ताने करंजेपूल (ता. बारामती) येथील मुख्य चौकात पार पडलेल्या सभेत खोपडे बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वैभव गायकवाड होते. याप्रसंगी आघारकर संशोधन संस्थेचे अधिकारी अजित चव्हाण, प्राचार्य धनंजय बनसोडे, प्रा. अक्षय काळकुटे, तुषार बनसोडे, बाळासाहेब मोटे, ज्ञानेश्वर भागवत, भगवान कुसेकर, विनोद जगताप आदी उपस्थित होते. यानिमित्ताने 
आयोजित केलेल्या 'विज्ञान रॅली'मध्ये 'भाज्ञाविस'सह मु. सा. काकडे महाविद्यालय, स्वामी विवेकानंद अभ्यासिका, सोमेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय, सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय, उत्कर्ष आश्रमशाळा, न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी, माध्यमिक विद्यालय खंडोबाचीवाडी, साद-संवाद ग्रुप आदींनी सहभाग नोंदविला. 

खोपडे म्हणाले, आपली शिक्षणपध्दती कालबाह्य झाली आहे. ती वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यास मदत करणारी नाही. निसर्गाशी, माणसांशी जोडलेले व प्रश्न विचारायला शिकविणारे शिक्षण हवे. ते नसल्याने सनातनी विचारधारेस सामान्य तरूणही बळी पडतात. तरूणांनी रूढी-परंपरांना प्रश्न विचारावेत. वर्णव्यवस्था नाकारून माणूस म्हणून एकमेकांशी नाती जोडावीत. सोमेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॅा. अजय देशमुख म्हणाले, अंधश्रध्दा, गरीबी हे दूर करण्याचे विज्ञान हे एक मोठे माध्यम आहे. प्रश्न विचारण्याची संस्कृतीच संशोधनाकडे घेऊन जाऊ शकते. नौशाद बागवान व आकाश सावळकर यांनी सूत्रसंचालन केले व समीक्षा संध्या मिलींद यांनी आभार मानले. 

विज्ञान रॅली, पथनाट्य आणि भारूड
काकडे महाविद्यालय - सोमेश्वर कारखाना ते करंजेपूल अशी पायी 'विज्ञान रॅली' पार पडली. 'आस्क व्हाय', 'जवाब दो' सारख्या घोषणा देत एक हजार युवकांनी रॅलीत सहभाग नोंदविला. करंजेपूलच्या मुख्य चौकात अजहर नदाफ, अक्षता देशपांडे यांच्या पथकाने विज्ञानाचे भारूड सादर केले तर काकडे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी 'उठ तरूणा जागा हो' हे पथनाट्य सादर केले. युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी चळवळीची गाणी गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com