एक दिवसाची 'एन्जॉयमेंट' अन्‌ आयुष्यभराचा त्रास - गणेश तिकोने 

Dahihandi
Dahihandi

पुणे - दहीहंडी उत्सव, त्यातील "एन्जॉयमेंट', तो थरार हे सगळे एका दिवसाचे असते; पण त्यातून झालेल्या दुखापती मात्र आयुष्यभर त्रास देत असतात... गोविंदा म्हणून दहीहंडी फोडताना यापूर्वी हाता-पायाला इजा झालेले कसबा पेठेतील कान्होबा उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश तिकोने बोलत होते...

दहीहंडी फोडताना राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमधून गेल्या वर्षी 108 या आपत्कालीन वैद्यकीय सेवेतर्फे (ईएमएस) 29 जणांवर तातडीने उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. यंदा "ईएमएस'ने गेल्या वर्षीच्या तुलनेत तिपटीहून जास्त रुग्णांवर उपचार केले. त्या पार्श्‍वभूमीवर गोविंदा म्हणून दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या तिकोने यांच्याशी "सकाळ'ने संवाद साधला.

ते म्हणाले, 'दहीहंडी फोडताना पडल्यानंतर काही दिवस रुग्णालयात दाखल होतो. त्या वेळी पथकातील मुले सारखी येत होती. मदत करत होती; पण पंधरा दिवस रुग्णालयात माझ्या घरातील होते. घरी गेल्यानंतरही माझे सगळे घरातील लोकांना करावं लागत होतं. रुग्णालयातील खर्च मंडळ करते; पण घरी गेल्यानंतरचे काय, या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नसल्याची भावना तिकोने यांनी व्यक्त केली.

मुंबईखालोखाल पुण्यात रुग्णसेवा
"ईएमएस'तर्फे मुंबईत 53 गोविंदाना रुग्णसेवा दिली असून, त्या खालोखाल पुण्याचा समावेश आहे. पुण्यात 19, तर अकोल्यामध्ये 13 गोविंदा दहीहंडी फोडताना जखमी झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

वाढते बक्षीस
पुण्यात सात ते आठ वर्षांपूर्वी दहा-अकरा हजार ते जास्तीत जास्त 51 हजार रुपयांपर्यंत दहीहंडीची बक्षीस होते. ती रक्कम आता लाखांपर्यंत गेली आहे. यामुळे गोविंदा पथक सहापेक्षा अधिक थराचे मनोरे करून दहीहंडी फोडण्याचे धाडस करतात. त्यामुळे आता सहापेक्षा जास्त थर करू नये, असे निर्बंध आणण्याची आवश्‍यकता असल्याचे मतही काही गोविदांनी व्यक्त केले.

'उंचावरून पडल्याने काहींच्या डोक्‍याला आणि मणक्‍याला मार लागला आहे. या रुग्णांना तातडीने प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहीहंडी उत्सवात मणक्‍याला इजा होणार नाही, अशा पद्धतीने काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली असल्याचे यातून स्पष्ट होते.''
डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, 108 "बीव्हीजी' आपत्कालीन वैद्यकीय सेवा.

काय केले पाहिजे?
- गोविंदांचा विमा उतरविला पाहिजे
- दहीहंडी फोडताना सांधे सुरक्षित करा
- गोविंदांच्या सुरक्षेची मंडळांनी काळजी घ्यावी
- सर्वांत वरच्या गोविंदाला क्रेन सुरक्षा द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com