पुण्यात दहीहंडी उत्सव रद्द करून पूरग्रस्तांना मदत

रिना महामुनी-पतंगे
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

दरवर्षी गोकुळाष्टमीचा सण शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून गोविंदा पथकांना हंडी फोडण्यासाठी रोख रकमेचे बक्षीस देण्यात येते. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी धनकवडी येथे गर्दी असते. यंदा मात्र हे चित्र बदलणार आहे. धनकवडी व परिसरातील विविध दहीहंडी उत्सव मंडळातर्फे सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापुराच्या संकटामुळे उत्सव रद्द करून बक्षिसाची रक्कम पूरग्रस्तांना दिली जाणार आहे. 

पुणे : गोकुळाष्टमीचा सण दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून गोविंदा पथकांना हंडी फोडण्यासाठी रोख रकमेचे बक्षीस देण्यात येते. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी धनकवडी येथे गर्दी असते. यंदा मात्र हे चित्र बदलणार आहे. धनकवडी व परिसरातील विविध दहीहंडी उत्सव मंडळातर्फे सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापुराच्या संकटामुळे उत्सव रद्द करून बक्षिसाची रक्कम पूरग्रस्तांना दिली जाणार आहे. 
कानिफनाथ तरुण मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट, अखिल धनकवडी गावठाण सार्वजनिक दहीहंडी उत्सव ट्रस्ट, धनकवडी फ्रेंड्‌स ग्रुप, बालाजी नगर शिवांजली मित्र मंडळ, भारती विद्यापीठ राजे चौक मित्र मंडळ, वनराई कॉलनी मित्र मंडळाने  दहीहंडी उत्सव रद्द केला आहे, तर काहींनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंडळातर्फे जीवनावश्‍यक वस्तू पूरग्रस्तांपर्यंत पोचवण्यात आल्या आहेत. अखिल धनकवडी गावठाण सार्वजनिक दहीहंडी उत्सव ट्रस्टचे संस्थापक विकास चव्हाण म्हणाले, यंदा ट्रस्ट तर्फे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. पूरग्रस्तांना ब्लॅंकेट, पाण्याच्या बाटल्या आणि कोरडा खाऊ देण्यात आला आहे. तर पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. मात्र यंदा दहीहंडी देखील साजरी केली जाणार आहे. असे कानिफनाथ तरुण मित्र मंडळाचे संस्थापक सागर भागवत यांनी सांगितले. 

'यावर्षी स्पीकरच्या भिंतीचा व इतर खर्च न करता पूरग्रस्तांसाठी आर्थिक व जीवनावश्‍यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे.'
- प्रतीक कातोर, सभासद, धनकवडी गावठाण फ्रेंड्‌स ग्रुप 

' संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन दहीहंडी रद्द करून हंडीचा निधी व आवश्‍यक वस्तू पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात येणार आहे. '
- महेश गवळी, सभासद, अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi festival canceled in Pune