आवाजाची पातळी ओलांडल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

असे ठेवणार नियंत्रण
- सीसीटीव्हीद्वारे लक्ष
- पोलिस पथके मोजणार ध्वनिवर्धकाच्या आवाजाची पातळी
- रात्री दहा वाजेपर्यंतच ध्वनिवर्धकांचा वापर
- बेवारस वस्तू, संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला (100 नंबरवर) कळविण्याचे आवाहन

पोलिसांचा इशारा; दहीहंडीसाठी शहरात आज चोख बंदोबस्त
पुणे - शहरामध्ये शनिवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी पुणे पोलिस दलाकडून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्सवामध्ये ध्वनिवर्धकाच्या आवाजाच्या मर्यादेबाबत उच्च न्यायायालयाने घालून दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरातील महात्मा फुले मंडई परिसर, हुतात्मा बाबू गेनू चौक, बेलबाग चौक, शनिपार, जिलब्या मारुती चौक, शिवाजी रस्ता, गुरुवार पेठेतील जैन मंदिर चौक या मध्यवर्ती भागात 73 दहीहंडी उत्सव मंडळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. तर उर्वरित 910 मंडळे चंदननगर, वडगाव शेरी, विमाननगर, सिंहगड रस्ता, वारजे, कोथरूड अशा उपनगरांमध्ये असून तेथेही मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्यवर्ती भागामध्ये पोलिसांकडून दुपारनंतर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. याबरोबरच सोनसाखळी, पॉकेट चोरी, महिला-तरुणींची छेडछाड यांसारखे प्रकार टाळण्यासाठी गुन्हे शाखेची पथके, साध्या वेशातील पोलिस सक्रिय राहणार आहेत. उपनगरांमधील दहीहंडी उत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या परवानग्या घेतल्या आहेत. तेथेही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi Sound Level Crime Police