शहरात दिवसभर संततधार पाऊस

daily Raining in the city
daily Raining in the city

पिंपरी : शहरात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने विविध भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पर्यायाने, नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रावेत येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते. तर, पवना नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. 

पेठ क्रमांक 22 येथील संग्रामनगर, राजनगर परिसरातील सुमारे 105 झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. महापालिकेतर्फे येथील टपरी जेसीबीने उचलण्यात आली. तसेच, पावसाळी गटार फोडून पाणी वाहून जाण्याची सोय करण्यात आली. चिखली येथील घरकुल सोसायटीतील शेवटच्या इमारतीत पार्किंगमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तसेच, बसथांब्याच्या परिसरात देखील पाणी साचल्याचे चित्र पहायला मिळाले.

पावसाळी गटारात येथे दगड टाकण्यात आले होते. हे दगड जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आले. मुळानगर (सांगवी) येथील 25 ते 30 झोपड्यांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले होते. त्याशिवाय, पिंपरी- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामागे असलेल्या महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत नाल्याचे पाणी शिरले होते. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, आशा राऊत, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी पाहणी केली. तसेच, तातडीने आवश्‍यक उपाययोजना सुरू केल्या. 

सखल भागांमध्ये पाणी 
शहरातील विविध सखल भागांमध्ये आणि रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. पुनावळे, प्राधिकरण-वाल्हेकरवाडी येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले. प्राधिकरणातील आशीर्वाद कॉलनी, सिद्धिविनायक नगरी परिसरामध्ये काही नागरिकांच्या घरात सांडपाणी नलिकेचे पाणी शिरले. रावेत-भोंडवे कॉर्नर येथे रस्त्यावर पाणी साचले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com