डाळ नरमली!

महेंद्र बडदे - @mahendra_badade
बुधवार, 1 मार्च 2017

वरुणराजाच्या कृपेमुळे कडधान्ये आवाक्‍यात

वरुणराजाच्या कृपेमुळे कडधान्ये आवाक्‍यात

पुणे - चांगला पाऊस आणि अनुकूल वातावरणामुळे देशात धान्य, कडधान्यांचे उत्पादन वाढले आहे. गगनाला भिडलेले डाळींचे भाव घसरले असून, प्रतिकिलो दोनशे रुपयांपर्यंत गेलेली तूरडाळ ७५ रुपयांवर आली आहे. मिरचीच्या दरातही घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांतील हे सर्वांत कमी भाव नोंदविले गेले आहेत. गहू, ज्वारी, बाजरीचे भाव मात्र टिकून आहेत.
१.     गेल्या दोन वर्षांत पावसाने साथ न दिल्याने धान्य, कडधान्यांचे उत्पादन घटले व त्याचा परिणाम बाजारावर झाला.
२.     उत्पादनातील वाढीमुळे या वर्षी डाळींचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. तीन वर्षांपूर्वी जेवढे भाव होते, त्यापेक्षाही कमी भाव आहेत. 
३.     गहू, ज्वारी, बाजरी यांचे भाव टिकून आहेत. मिरचीच्या भावांत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत मिरचीच्या भावांत मोठ्या प्रमाणावर तेजी आली होती. 
४.     घाऊक बाजारात जरी मालाची किंमत कमी होत असली तरी, किरकोळ विक्रीच्या भावांत तेवढ्या वेगाने घट होत नाही.

सध्याचे किरकोळ विक्रीचे भाव 
तूरडाळ (७५-८०), हरभराडाळ (७०), मूगडाळ (७०), मसूरडाळ (६० ते ७०), मटकीडाळ (७०-७५), उडीदडाळ (८०-८५), हरभरा (६०-६५), मसूर (६०-६५), मूग (७०), मटकी (१००). 
(हे भाव शहराच्या विविध भागांत वेगळे असू शकतात.)

घाऊक-किरकोळ भावांत फरक का? 

घाऊक बाजारातील भाव आणि किरकोळ विक्रीच्या भावांत प्रतिकिलोमागे दहा ते पंधरा रुपयांचा फरक पडतो. भावांतील चढ-उताराप्रमाणे किरकोळ विक्रीच्या भावांत सातत्य ठेवावे लागते. किरकोळ विक्री करताना पावशेर, अर्धाकिलो, एक किलो आदी वजनाच्या प्रमाणात मालाची विक्री केली जाते. ही विक्री करताना प्रतिपोत्यामागे दोन किलोची घट येत असते. काही माल हा वजन करताना पडतो, मालाची प्रत दाखवितानाही माल सांडतो अशा कारणांमुळे होणारे नुकसान भरून काढणे, मालवाहतूक भाडे, जागेचे भाडे, वीज बिल आदी खर्च भागविण्यासाठी घाऊकपेक्षा किरकोळ विक्री करताना जास्त भाव लावावा लागतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

येथून होते आवक
कर्नाटक : तूरडाळ
मध्य प्रदेश : मसूर, मटकी
राजस्थान : मटकी
गुजरात : गहू ः सिहोर
मध्य प्रदेश : गहू ः लोकवन

महाराष्ट्र - 
मराठवाडा : हरभरा, तूर
अहमदनगर, जामखेड, 
सोलापूर - ज्वारी

Web Title: dal rate decrease