एल्गार मोर्चात दलित समाजाबरोबरच मराठा, मुस्लिम समाजाचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

या आंदोलनासाठी मुंबई शहर, उपनगराबरोबरच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर येथील तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी, जळगांव येथील आंदोलक मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले आहेत. सीएसटीहून जथ्तेच्या जत्थे आझाद मैदानाकडे जाताना दिसत आहेत.

मुंबई : भिमा कोरेगांव येथील हल्ल्याप्रकरणातील सुत्रधार असलेल्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीवरून पुकारण्यात आलेल्या एल्गार आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात झाली. या आंदोलनात दलित समाजाबरोबरच मराठा, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनीही सहभागी घेतला असून हजारोंच्या संख्येने आंदोलक आझाद मैदानावर जमा होत आहेत.

या आंदोलनासाठी मुंबई शहर, उपनगराबरोबरच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर येथील तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी, जळगांव येथील आंदोलक मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले आहेत. सीएसटीहून जथ्तेच्या जत्थे आझाद मैदानाकडे जाताना दिसत आहेत.

दरम्यान,पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने सर्व कार्यकर्त्ये आझाद मैदानावर अद्याप पोहोचले नाहीत. त्यामुळे मुंबईबाहेरून येणारे अनेक कार्यकर्त्ये पूर्वीच्या ठरलेल्या ठिकाणी अर्थात भायखळा येथे पोहोचले आहेत. त्यांना आझाद मैदानावर येण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मोर्चाचे निमंत्रक तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

त्याचबरोबर या मोर्चामध्ये सामाजिक सलोखा राखण्याच्या विचाराचे असलेल्या अनेक समाजाच्या संघटना यात सहभागी होणार आहेत. लिंगायत, मराठा आणि मुस्लिम समाजातील काही संघटना यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर या आंदोलनाचे जाहीर सभेत रूपांतर होईल आणि त्यानंतर संभाजी भिडेला अटक करण्यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात जावून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Dalit community elgar morcha on azad maidan in Mumbai