पुराची टांगती तलवार अद्यापही कायम

ज्ञानेश्‍वर बिजले 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भीमा व कृष्णा नदीच्या खोऱ्यातील धरणे फुल्ल झाली असून, पावसाळ्याच्या उर्वरीत दोन महिन्यांत पावसाचा जोर वाढला, की पुराची टांगती तलवार यापुढेही कायम राहील. या दोन्ही खोऱ्यांतील धरणांची एकूण साठवण क्षमता 428.27 अब्ज घनफूट (टीएमसी) असून, या 39 धरणांमध्ये शनिवारी (ता. 10) सकाळी 407.52 टीएमसी (95.16 टक्के) एवढा उपयुक्त साठा आहे. गेल्या वर्षी दहा ऑगस्टला साठा 344.92 टीएमसी (80.55 टक्के) होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस असल्याने, मोठ्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

पुणे  भीमा व कृष्णा नदीच्या खोऱ्यातील धरणे फुल्ल झाली असून, पावसाळ्याच्या उर्वरीत दोन महिन्यांत पावसाचा जोर वाढला, की पुराची टांगती तलवार यापुढेही कायम राहील. या दोन्ही खोऱ्यांतील धरणांची एकूण साठवण क्षमता 428.27 अब्ज घनफूट (टीएमसी) असून, या 39 धरणांमध्ये शनिवारी (ता. 10) सकाळी 407.52 टीएमसी (95.16 टक्के) एवढा उपयुक्त साठा आहे. गेल्या वर्षी दहा ऑगस्टला साठा 344.92 टीएमसी (80.55 टक्के) होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस असल्याने, मोठ्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

पावसाची उघडीप झाल्याने, धरणांतून विसर्ग सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. परंतु, बहुतेक धरणाच्या क्षेत्रांत पाऊस सुरूच आहे. काही ठिकाणी दिवसभर रिमझीम सरी बरसत आहेत, तर काही ठिकाणी पर्जन्यवृष्टी होत आहे. धरणांमध्ये आता पाणी अडवून ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने, धरणाच्या जलाशयात जमा होणारे पाणी तास-दोन तास नियंत्रित करून पुढे सोडण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही शिल्लक राहिलेले नाही. जोरदार पावसामुळे, धरणातील येवा म्हणजे येणारे पाणी वाढल्यास, ते तसेच पुढे सोडून द्यावे लागणार आहे. 

कृष्णा उपखोऱ्यातील 12 धरणांची साठा क्षमता 209.88 टीएमसी असून, तेथे 198.46 टीएमसी (94.57 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. प्रत्येक धरणांच्या जलाशयात पाच-सहा टक्के जागा शिल्लक असली तरी, काल दिवसभरात अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची दमदार हजेरी होती. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठपर्यंतच्या 24 तासांत 286 मिलीमीटर पाऊस पडला. अन्य धरणांमध्ये तुळशी (279 मिमी), राधानगरी (208 मिमी), पाटगाव (201 मिमी), दूधगंगा (168 मिमी), वारणा (164 मिमी), धोम बलकवडी (127 मिमी), कासारी (108 मिमी) अशी पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोयनेतून 75 हजार घनफूट प्रति सेकंद (क्‍युसेक), वारणा धरणातून 11 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. अन्य धरणांतूनही कमी प्रमाणात पाणी सोडले जात आहे. 

भीमा उपखोऱ्यातील उजनी धरण पूर्ण भरले असून, त्यातून 90 हजार क्‍युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे. भीमा उपखोऱ्यातील 27 धरणांची एकूण साठा क्षमता 218 टीएमसी असून, त्यामध्ये आज 209.07 टीएमसी (95.72 टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी दहा ऑगस्टला 154 टीएमसी (70.51 टक्के) साठा होता. मुठा व नीरा खोऱ्यातील सर्व आठ प्रमुख धरणे, तसेच भीमा नदीवरील धरणेही पूर्ण भरली आहेत. त्यामुळे, पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणांच्या जलाशयातून थेट उजनीच्या दिशेने झेपावत आहे. उजनी व वीर धरणातून सोडण्यात येत असलेले एक लाख क्‍युसेकपेक्षा अधिक पाणी पंढरपूरच्या दिशेने वाहात आहे. पंढरपूरातील नदीपात्राची क्षमता दोन लाख क्‍युसेकची असल्यामुळे, त्या गावाला पुराचा धोका न पोहोचता पाणी तेथून कर्नाटकाच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dam in the Bhima Krishna Valley is full