धरणे भरली; पण घरात पाणी येईना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

धरणे भरल्यानंतर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे; परंतु अजूनही कोथरूडमधील सुतारदरा, शास्त्रीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

पौड रस्ता - धरणे भरल्यानंतर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे; परंतु अजूनही कोथरूडमधील सुतारदरा, शास्त्रीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सुतारदरा येथील सचिन मुरमुरे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त व मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे. मुरमुरे म्हणाले, की मी स्थानिक नगरसेवक, आमदारांना आमच्या पाणी प्रश्नाबाबत वारंवार कळवले आहे.

सुतारदरा येथील समर्थ कॉलनी गल्ली क्रं. १ ते ७ मध्ये मे महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येथे घरे छोटी असल्याने पाणी साठवण्यासाठीची जागा नाही. त्यातच अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने महिलांचे हाल होतात. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, यासाठी शेवटी आम्ही महापालिका आयुक्त व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

हमराज चौक, शास्त्रीनगर येथील शालन साळुंखे म्हणाल्या, की दरवेळी तक्रार केली की, दोन-तीन दिवस व्यवस्थित पाणी येते. नंतर परत कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे चावी सोडणारे ठेकेदार यांच्या कामाविषयी संशय निर्माण होतो. आम्हाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा ऐवढीच आमची मागणी आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली असता, नळाला विद्युत पंप लावून उपसा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने काही भागात कमी दाबाने पुरवठा होतो. अशा पंपांवर कारवाई केली किंवा पाणीपुरवठ्याच्या वेळेत वीज बंद केली तर ही समस्या दिसणार नाही; परंतु पाणीपुरवठा विभाग अशी हिंमत दाखवत नाही. त्यामुळे हा प्रश्न सुटणे अवघड असल्याचे त्यांनी खासगीत सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dam Full But Water Not in Home