पाणीसाठा खालावला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

खडकवासला, पानशेत धरणातील स्थिती; पालिकेकडून कपातीची शक्‍यता

खडकवासला, पानशेत धरणातील स्थिती; पालिकेकडून कपातीची शक्‍यता
पुणे - शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमधील पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मागील वर्षीपेक्षा 11.62 टक्के इतका पाणीसाठा कमी झाला असून, पुणे महापालिकेला पाणीकपातीचे धोरण तयार करण्याबाबत जलसंपदा विभागाने आदेश दिले आहेत. 15 जुलैपर्यंत अपेक्षित पाऊस पडला नाही, तर पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

खडकवासला आणि पानशेत या दोन धरणांत मिळून एकूण 3.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर धरणाचे काम सुरू असल्याने हे धरण पूर्णतः कोरडे ठेवण्यात आले आहे. तर, वरसगाव धरणातील पाणीसाठा उपयोगात आणता येत नाही. काही दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाने पाण्याचे नियोजन करण्याचे ठरविले होते. त्यानुसार 2.65 टीएमसी शहराच्या दुसऱ्या आवर्तनासाठी, 3 टीएमसी शेती वापरासाठी, 0.76 टीएमसी आपत्कालीन व्यवस्था, ग्रामपंचायत आणि पालखी सोहळ्यासाठी असे 15 जुलैपर्यंतचे नियोजन असून, 0.60 टीएमसी बाष्पीभवन होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून 1401 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान असून, काही भागांत पाऊस होत आहे. परंतु, धरणातील पाणीपातळी वाढविण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

यंदाच्या वर्षी उष्णतेची दाहकता आणि महानगरपालिकेचा अतिरिक्त पाणीवापर यामुळे मागील वर्षीपेक्षा धरणातील पाणीपातळी वेगाने खालावली आहे. त्यातच मॉन्सून वेळेत दाखल झाला नाही, तर पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पाणी वापरासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाणीकपातीचे धोरण तयार करावे, असे कळविले आहे.''
- तात्याराव मुंडे, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.

Web Title: dam water lavel decrease