शेतकऱ्यांचा घास पावसाने हिरावला 

महेंद्र शिंदे
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

खेड तालुक्‍यात सततच्या पावसाचा परिणाम कांदा लागवडीवर झाला असून, तालुक्‍यातील कांदा लागवड मंदावली आहे. सोयाबीन पिकासह तरकारी पिकांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

कडूस (पुणे) : खेड तालुक्‍यात सततच्या पावसाचा परिणाम कांदा लागवडीवर झाला असून, तालुक्‍यातील कांदा लागवड मंदावली आहे. सोयाबीन पिकासह तरकारी पिकांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

खेड तालुक्‍यात तीन धरणांमुळे तरकारी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मुख्यतः चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या परिसरातील गावांच्या शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. पाणी उपलब्ध होत असल्याने तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील कडूस, वेताळे, सायगाव, साबुर्डी, दोंदे, पापळवाडी, बहिरवाडी, चास, कडधे, कमान, मोहकल, पांगरी, काळेचीवाडी व सातकरस्थळ आदी गावांतील शेतकरी कोथिंबीर, मेथी, कोबी, फ्लॉवर, कारले, भोपळा, घोसाळे, मिरची आदी तरकारी पिके घेत असतात. परंतु पावसाने या तरकारी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. 

सततच्या पावसामुळे पिके रोगाला बळी पडली आहेत. पिकांवर औषध फवारणी करूनही उपयोग होत नाही. औषधे फवारली तरी पावसामुळे ते वाया जात आहे. रोग आटोक्‍यात येत नसल्याने शेतातील पिके करप्याने जागच्या जागेवर बसली आहेत. पिके सोडून देण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. 

खेड तालुक्‍यात कांदा लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे. या वेळी तालुक्‍यात कांदा लागवडीची धांदल सुरू असते. परंतु, यंदा पावसामुळे कांदा लागवड मंदावली आहे. काही ठिकाणी वाफसा नाही, तर काही ठिकाणी पावसाने रोपे वाया गेली आहेत. एखाद्या ठिकाणी लागवड केली आणि पाऊस झाला, तर ही लागवड वाया जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी कांदा लागवड करीत आहेत. सोयाबीन पिकालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनला मोड आले आहेत. काढणी केलेले पीक शेतातच ढीग करून झाकून ठेवले असून, त्यालाही मोड येऊ लागले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to agriculture in Khed taluka