अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांच्या दुरूस्तीची गरज, अन्यथा पाणी टंचाई 

Dams need to be repaired due to heavy rains otherwise water scarcity
Dams need to be repaired due to heavy rains otherwise water scarcity

सुपे : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील रस्ते व छोट्या-मोठ्या पुलांची दुरवस्था झाली आहे. ओढ्या-नाल्यांवरील बंधाऱ्यांना व काही तलावांना मोठी हानी पोचली आहे. अनेक बंधाऱ्यांचे भराव वाहून गेल्याने गळती सुरू झाली आहे. अशा सर्व बंधाऱ्यांची तातडीने दुरूस्तीची गरज आहे. अन्यथा एवढा पाऊस होऊनही काही दिवसातच पाणी टंचाई जाणवू शकते, असे चित्र आहे. 

कधी नव्हे एवढा पाऊस तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातही झाला आहे. अगदी एका दिवसात सुप्यात १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अवर्षण-प्रवण भागात संपूर्ण वर्षभरात सरासरी ३५० मिमी पाऊस पडण्याचे प्रमाण आहे. असे असताना ऑक्टोबर अखेर एकूण सुमारे ७५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सतत धो-धो पडणाऱ्या पावसामुळे अगदी हातातोंडाशी आलेली उभी पीके सपाट झाली. कांदा, भाजीपाल्याची पीके मातीमोल झाली. जमिनी वाहून गेल्या. फळबागांमध्ये पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले आहे. परिणामी शेती व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबरोबरच ओढ्या-नाल्यांवर बांधलेल्या छोट्या बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक बंधाऱ्यांचे भराव खचले, काही वाहून गेले. सांडव्याला क्षती पोचली. अनेक बंधाऱ्यांना गळती सुरू झाली. तर जवळपास सर्वंच बंधाऱ्यांमध्ये गाळ साचून उथळ झाले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यांची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे. त्यात गळती सुरू असल्याने उपलब्ध पाणी वाहून जाऊन संपुष्टात यायला वेळ लागणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. बंधाऱ्यात गाळ साचल्याने पाणी कमी झाल्यानंतर गाळ काढण्याची परवानगी सरकारने शेतकऱ्यांना दिली तर बंधाऱ्यांची पाणीसाठवणुक क्षमता पुन्हा जागेवर येणार आहे. 

    अनेक ठिकाणी रस्ते व पुल वाहून गेल्याने दळणवळणाचा प्रश्न भेडसावत आहे. पानसरेवाडीच्या कासारमळ्याजवळील लिंबजाई ओढ्यावरील पुल वाहिल्याने येथील रहिवाशांचा गावाशी संपर्क तुटल्याची माहिती माजी उपसरपंच सचिन कदम, विजय पानसरे यांनी दिली. राजबाग येथील बंधाऱ्याच्या सिमेंटच्या भींती पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेल्याची माहिती सरपंच विशाल भोंडवे यांनी दिली. कुतवळवाडीच्या वरच्या ओढ्यावरील बंधाऱ्याचा भराव फुटल्याने ओढ्याचे पात्र बदलल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे माजी सभापती दत्तात्रेय कुतवळ यांनी दिली. लगतची जमिन वाहून व पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. 

वढाणे येथील पद्मावती तलावाचा सांडवा फुटून तलावातील पाण्याची गळती चालू आहे. इनामवस्ती परिसरातील आठ-दहा नाले फुटले असून, पाच विहिरी बुजल्याची माहिती येथील रामभाऊ लकडे, चंदन चौधरी यांनी दिली. या सांडव्याची पाहणी तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, शाखा अभियंता आप्पा कोकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सभापती नीता बारवकर, भरत खैरे आदींसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांची नुकतीच केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com