नृत्यातून उलगडले ज्ञानेश्‍वरीतील प्रसंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

गौरी ढवळे यांची रचना; अकरा ओव्यांवर आधारित ‘अखंड’

पुणे - ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म कशाला म्हणावे, या अर्जुनाच्या प्रश्‍नाला उत्तरे देताना श्रीकृष्ण म्हणतात ‘तूच ब्रह्म आहेस, मनःशांतीसाठी करायचे ते सत्कर्म होय...’ गीतेतील या तत्त्वज्ञानाला मराठीत ज्ञानेश्‍वरांनी आणले. हेच प्रसंग लयदार नृत्याच्या माध्यमातून उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, नृत्यांगना गौरी ढवळे यांनी.

गौरी ढवळे यांची रचना; अकरा ओव्यांवर आधारित ‘अखंड’

पुणे - ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म कशाला म्हणावे, या अर्जुनाच्या प्रश्‍नाला उत्तरे देताना श्रीकृष्ण म्हणतात ‘तूच ब्रह्म आहेस, मनःशांतीसाठी करायचे ते सत्कर्म होय...’ गीतेतील या तत्त्वज्ञानाला मराठीत ज्ञानेश्‍वरांनी आणले. हेच प्रसंग लयदार नृत्याच्या माध्यमातून उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, नृत्यांगना गौरी ढवळे यांनी.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्‍वरी ही भगवद्‌गीतेवरील टीका होय. केवळ श्रीकृष्ण अर्जुन संवाद एवढ्यापुरतेच त्याकडे न पाहता, मनुष्याच्या दैनंदिन जीवनशैलीशी निगडित अनेकविध प्रसंगाचे दाखले ज्ञानेश्‍वरी वाचनातून उलगडतात. प्रत्येक अध्यायातील ओवीतल्या शब्दांतूनही एखाद्या अनुभूतीचा गर्भितार्थ स्फुरतो. नृत्यांगना गौरी यांच्याही वाचनात ज्ञानेश्‍वरीचा आठवा अध्याय आला. तेव्हा त्यांनाही सद्यःस्थितीतील प्रसंगांशी मिळतेजुळते वास्तव वर्णन या अध्यायातून उलगडत असल्याचे जाणवले आणि त्यांनी अध्यायातील अकरा ओव्यांचा आधार घेऊन ‘अखंड’ या नृत्यनाटिकेची रचना केली. मीरा ॲकॅडमी ऑफ क्‍लासिकल डान्स या संस्थेची स्थापनाही ढवळे यांनी केली असून, येत्या रविवारी (ता. २ एप्रिल) सायंकाळी साडेपाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे या नृत्यनाटिकेचे सादरीकरण आहे.

‘अलारिपू’, ‘जतिस्वरम्‌’, ‘वर्णम्‌’, ‘पद्म’, ‘तिल्लाना’ आदी भरतनाट्यममधील नृत्यप्रकारांवर आधारित ‘अखंड’ची रचना रसिकप्रेक्षकांना सहजच भावते. आठव्या अध्यायातील विचार मनावर बिंबल्याने मी या कलाकृतीची रचना करू शकले, असे सांगणाऱ्या गौरीही विनम्रतेने ज्ञानेश्‍वरीपुढे नतमस्तक होतात.

नृत्यनाटिकेला एम. शाम कल्याण यांनी कर्नाटकी संगीत दिले आहे. अदिरा श्रीरंग (नटूवंगम्‌), कलामंडलम्‌ विष्णू टी. एस. (गायन), कलामंडलम्‌ श्रीरंग (मृदंग), कलामंडलम्‌ उन्नीकृष्णन्‌ (घडम्‌), बिजू चल्लकुडी (वीणा), विनोद कुमार कोप्पम (बासरी) आदींची त्यांना साथसंगत लाभली आहे.

संभ्रमावस्थेतील अर्जुनाला श्रीकृष्णाने वास्तव जीवनाचा अर्थ सांगितला. ज्ञानेश्‍वरीत वर्णिलेल्या या प्रसंगाची भाषा मनाला स्पर्श करते. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलेले प्रश्‍न आजही सामान्य व्यक्तीच्या जीवनाशी निगडित आहेत. ते आपणही शोधू शकतो का? जो ब्रह्मतत्त्व आत्मसात करतो तोच ब्राह्मण होय. तू ब्रह्म आहेस. स्वत्व ही तुझी ओळख होय. ही व्यावहारिक वास्तवता त्या अध्यायात वर्णिली आहे. भरतनाट्यमच्या भाषेतून ज्ञानेश्‍वरांचे हे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
- गौरी ढवळे, नृत्यांगना

Web Title: dance riddle dnyaneshwari event