पेशवे तलावाच्या भिंतीला धोका

विकास कोठवळ
सोमवार, 20 जानेवारी 2020

तलावाच्या भिंतीलगत सांडव्याचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या अस्तरीकरणालाच भगदाड पडल्याने भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.

पुणे - महापुरानंतर साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावाच्या परिसरातील राडारोडा महापालिकेने अद्याप उचलला नाही. तलावाच्या भिंतीलगत सांडव्याचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या अस्तरीकरणालाच भगदाड पडल्याने भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे. हे भगदाड बुजविण्याचे कष्टही महापालिका घेत नसल्याने या ऐतिहासिक तलावाबाबत प्रशासन एवढे उदासीन का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या २५ सप्टेंबरच्या महापुरात पेशवे जलाशयाचे मोठे नुकसान झाले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे भिंतीवरील उभारलेले सिमेंट व लोखंडाचे संरक्षक रॉड ओढ्यात कोसळले. ते अद्याप तेथेच पडून आहेत. या रॉडच्या जागी तात्पुरते अँगल लावले आहेत.

तलावाच्या ओढ्यातील ड्रेनेजलाइन पुरात वाहून गेली आहे. यामुळे सांडपाणी पेशवे तलावासह कात्रज तलावात वाहून येत आहे. सांडपाणी वाहिन्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे हे सांडपाणी उघड्यावरून वाहत आहे. कात्रज गावठाणाच्या बाजूने असलेली संरक्षक भिंत ठिकठिकाणी पडल्याने मोकाट जनावरे उद्यानात शिरतात. परिसरातील स्मशानभूमीची कोसळलेली भिंतही अद्याप ‘जैसे थे’च आहे. काही दिवसांपूर्वी महापौर आणि आयुक्तांनी तलाव परिसराची पाहणी केली. तलावाच्या दुरुस्तीसाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही कार्यवाही झाली नाही. यामुळे महापुरामुळे तलावाच्या मागे लागलेले शुक्‍लकाष्ठ  कायम आहे. 

Image may contain: sky, outdoor, water and nature

स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन
तलावाच्या भिंतीचे २००९-१० मध्ये ऑडिट करण्यात आले. ही भिंत ३९ फूट खोल आहे. त्यामुळे महापुराचा भिंतीवर परिणाम संभवत नाही. ड्रेनेजचे काम त्वरित करून तलावात येणारे सांडपाणी रोखणे गरजेचे आहे. मात्र, या प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे तलावाची दुरवस्था झाली आहे, असा आरोप नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. 

Image may contain: outdoor

तलावात येणारे ओढ्याचे सांडपाणी रोखण्यासाठी मांगडेवाडीपर्यंत ड्रेजेनलाइन टाकली आहे. त्यापुढील कामही लवकर पूर्ण होईल. लेकटाउन भागात पुलाचे काम सुरू आहे.
- मनीषा कदम, नगरसेविका

महापालिका याबाबत आराखडा तयार करत आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करण्याची मागणीही करण्यात येणार आहे. सांडपाणी तलावात न येण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. 
- अशोक घोरपडे, प्रमुख, उद्यान विभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger to the nanasaheb Peshwa Lake wall