नेमेची धोका पुराचा 

नेमेची धोका पुराचा 

पिंपरी - पावसाळा सुरू झाला, की मनात भीती वाटतीया. पुराचं पाणी घरात शिरतं तवा पालिकेची लोकं येत्यात रात्रीअपरात्री. "नदीला पूर आलाय,' सांगत्यात. शाळेत राहायला घिवून जात्यात. अंगावरच्या कपड्यालत्यांनिशी मुलाबाळांना घिवून घराबाहेर पडावं लागतं. दरवर्षीचंच झालंय हे. उबग आलाय नुसता. फोटोपास आसूनबी उपेग नाय. कायमचं पुनर्वसन व्हायला पाह्यजे. कटकटच जाईल एकदाची... या भावना आहेत शहरातील नदीकाठच्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या. त्यांना प्रतीक्षा आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजना किंवा घरकुलमध्ये हक्काचे घर मिळेल याची. 

शहरातून वाहणाऱ्या पवना नदीकाठच्या पिंपरीतील झोपडपट्ट्यांत दरवर्षी पावसाचे पाणी शिरते. हीच स्थिती जुनी सांगवीत मुळा नदीच्या पुरामुळे उद्‌भवते. पुराचा धोका ओळखून नजीकच्या शाळा, समाजमंदिरांत नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केले जाते. भोजनाची व्यवस्था होते. पूर ओसरला, की स्थलांतरित मंडळी आपापल्या झोपडीकडे वळतात. तिची दुरुस्ती करतात. पुढच्या वर्षी पुन्हा हीच आपत्ती ओढवते. गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत शेती जाऊन गावांचे शहरीकरण व औद्योगिकीकरण झाले. राज्य व परराज्यांतून उदरनिर्वाहासाठी आलेली काही कुटुंबे नदीपात्रालगत झोपडी उभारून राहू लागले. त्यामुळे अशा वसाहतींचे पुरासह आग, भूकंप, वायुगळती अशा आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे. अन्य आपत्तींपेक्षा पुराच्या कालावधीतच त्यांना अधिक सतर्क राहावे लागत आहे. 

दरवर्षीचा धोका 
पिंपरीतील संजय गांधीनगर, आंबेडकरनगर, सुभाषनगर, भाटनगर, माता रमाईनगर : सुमारे 200 कुटुंबे 
जुनी सांगवीतील मुळानगर : 100 कुटुंबे 

मुलांच्या अभ्यासावर परिणाम 
आमचे सासरे 40-50 वर्षांपासून येथे राहत आहेत. त्यांच्याकडे फोटोपास (महापालिकेने दिलेला रहिवासी पुरावा) आहे. पण, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत नाव येत नाही. आम्ही तीन जावा आहोत. सर्वजण वेगवेगळे राहतो. कोणालाच फोटोपास मिळाले नाहीत. त्यामुळे धोका दिसत असूनही नाइलाजाने राहावे लागते. मुलगी बारावीला आहे. तिच्यासह मुलाच्या अभ्यासावर परिणाम होतो. पुनर्वसन झाल्यास मुलांना चांगले शिक्षण देता येईल, असे पिंपरीतील संजय गांधीनगरमधील सलमा अत्तार यांनी सांगितले. चंद्रकला राजू म्हणाल्या, ""दरवर्षी नदीला मोठा पूर आला, की आम्हाला सूचित केले जाते. घरांमध्ये पाणी शिरायला लागल्यावर शाळेत स्थलांतर केले जाते. फक्त अंथरूण, पांघरूण व स्वयंपाकाचे साहित्य नेतो. पूर कमी झाल्यावर पुन्हा राहायला येतो. पण, पुराच्या पाण्यामुळे घरातील साहित्याचे खूप नुकसान होते. घर दुरुस्त करावे लागते. त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. पुनर्वसन योजनेत घरकुल मिळायला हवे.'' 

नद्यांच्या पुराचे पाणी काही झोपड्यांमध्ये शिरते. तेथील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करून निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यासाठी आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे. अग्निशमन दलाची त्यांना मदत होते. स्थलांतरित नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी वैद्यकीय पथक नियुक्त केले जाते. बंदोबस्त तैनात असतो. परिसराची नियमित साफसफाई केली जाते. 
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com