धोकादायक इमारतीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

महादेव पवार
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

एनडीए रस्त्यावरील तपोधाम परिसरात सत्तावीस वर्षांपूर्वी कारवाई केलेल्या धोकादायक इमारतीचा सांगाडा धूळ खात पडून आहे. ही इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही आणि विशेष म्हणजे याच इमारतीच्या खाली जवळपास आठ दुकाने राजरोसपणे सुरू आहेत. पावसाळ्यात मोठी सर आली तर ती कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची वाट महापालिका पाहत आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वारजे - एनडीए रस्त्यावरील तपोधाम परिसरात सत्तावीस वर्षांपूर्वी कारवाई केलेल्या धोकादायक इमारतीचा सांगाडा धूळ खात पडून आहे. ही इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही आणि विशेष म्हणजे याच इमारतीच्या खाली जवळपास आठ दुकाने राजरोसपणे सुरू आहेत. पावसाळ्यात मोठी सर आली तर ती कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची वाट महापालिका पाहत आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

तपोधाम परिसरातील मुख्य रस्त्याच्या बाजूलाच अपूर्ण अवस्थेतील इमारत धोकादायक पद्धतीने उभी आहे. ही इमारत तीन मजली आहे, यावर जवळपास २७ वर्षांपूर्वी म्हणजेच वारजे भाग महापालिकेमध्ये समाविष्ट होण्याअगोदर बांधकाम विभागाने कारवाई केली होती. त्या वेळी संपूर्ण भिंती व स्लॅब निकामी करण्यात आले होते. या कारवाईला बरेच वर्ष उलटूनही अद्याप ती रस्त्याच्या कडेला उभी आहे. इमारतीच्या खालच्या भागात सुरू असलेल्या दुकानांना तिचा धोका आहे. येथे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बऱ्याच वर्षांपूर्वी कारवाई झाल्यामुळे या इमारतीचा धोका वाढला आहे. 

या बाबत ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत बाबा खान व गणेश गोकुळे यांनी हा मुद्दा मांडला होता. काही महिन्यांपूर्वी जुना बाजार परिसरात होर्डिंगचा सापळा कोसळून निष्पाप जिवांचा बळी गेला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेने ठोस पावले उचलली पाहिजे. 

यासंदर्भात बांधकाम विभागाचे सतीश शिंदे यांना वारंवार फोन करूनही कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

या इमारतीवर बऱ्याच वर्षांपूर्वी कारवाई केलेली आहे. याबाबत माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही. 
- गणेश सोनुने, सहायक आयुक्त, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय 

मुख्य रस्त्यावर ही इमारत आहे, तरीसुद्धा पालिकेचे दुर्लक्ष होत आहे ही खेदाची बाब आहे. पुण्यात काही महिन्यांपूर्वी होर्डिंगचा सापळा कोसळून मोठी दुर्घटना घडली. अशा प्रकारची घटना पुन्हा घडण्याची वाट पालिका पाहत आहे का? 
-  गणेश गोकुळे, वारजे जकात नाका

Web Title: Dangerous Building Municipal Ignore