जीव घेणारे दुभाजक

सुराणा चौक, सातारा रस्ता - रस्त्यांमधील दुभाजक रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अनेकदा चारचाकी वाहने दुभाजकांवर चढण्याच्या घटना घडतात.
सुराणा चौक, सातारा रस्ता - रस्त्यांमधील दुभाजक रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अनेकदा चारचाकी वाहने दुभाजकांवर चढण्याच्या घटना घडतात.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील स्थिती

पुणे - खरे तर रस्त्यावरील दुभाजक हे वाहनचालकांच्या, रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असतात; पण शहरातील परिस्थिती नेमकी उलटी आहे. सातारा, सोलापूर, नगर, विद्यापीठ आदी प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक नेमके कधी सुरू होतात, याचा कसलाही अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने दुभाजकावर वाहने चढून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. ठिकठिकाणी तुटलेले दुभाजक, दुभाजकांवर रंग नसणे, उंचीबाबतची असमानता, दुभाजक सुरू होण्यापूर्वी आवश्‍यक असणारे पट्टे, तसेच रिफ्लेक्‍टर नसणे, असे प्रकार प्रत्येक रस्त्यावर असल्याचे ‘सकाळ’च्या वतीने मंगळवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. दुभाजकांबाबत महापालिका आणि वाहतूक पोलिस यांच्यात कोणताही समन्वय, तसेच धोरणच नसल्याची बाबही समोर आली असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवरच ‘मृत्यूच्या दाढेत आपले स्वागत आहे,’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
बाणेर येथे सोमवारी दुभाजकावर उभ्या असणाऱ्या एका कुटुंबास एका मोटारीने उडवले. यानिमित्ताने प्रमुख सहा रस्त्यांवरील दुभाजकांची पाहणी करण्यात आली. त्यात ही भीषण परिस्थिती समोर आली.

बेदरकार वाहनचालकांना रोखा
शहरात वाहन चालविताना वाहनचालकांकडून अनेकदा तारतम्य पाळले जात नाही. पुढे जाण्याच्या घाईत भर वर्दळीच्या रस्त्यावरही बेदरकारपणे वाहने चालविण्याचे आणि त्यातून अपघात घडण्याचे प्रकारही वाढले आहेत. रस्ता थोडा मोकळा दिसला तरी वेगमर्यादेचे कोणतेही निकष अनेकांकडून पाळले जात नसल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 
 

असे आहेत दुभाजक
 दुभाजक कधी सुरू होतो, याची अनेक ठिकाणी कल्पना येत नाही
 दुभाजकांची उंची अनेक ठिकाणी असमान
 दुभाजकांची उंची कमी असल्याने व त्यावरील रंग उडाल्याने दुभाजकाचा अंदाज येत नाही
 दुभाजकासाठी वापरले जाणारे रंग निकृष्ट दर्जाचे
 अनेक ठिकाणी रंगाचे पट्टे, रिफ्लेक्‍टर नाहीत

गंभीर अपघात होऊनही महापालिका प्रशासन उपाययोजना करीत नाही. एखादी दुर्घटना घडल्यास हळहळ व्यक्त करण्याशिवाय काहीही केले जात नाही. आता तरी लोकांचे बळी जाऊ नयेत, यासाठी उपाययोजना कराव्यात.
- विजय धनकुडे, स्थानिक रहिवासी

या ठिकाणी अपघात झाल्यानंतर वेळोवेळी प्रशासनाला कळवूनही उपाययोजना केली जात नाही. अपघात रोखण्यासाठी येथे गतिरोधकासह रस्ता दुभाजकांची उंची वाढवणे आवश्‍यक आहे. तरच येथील अपघातावर नियंत्रण येईल. 
- गणेश मुरकुटे, स्थानिक रहिवासी

सातारा रस्ता - अपघातांची मालिका तरीही दुर्लक्ष

चुकीची बांधणी, अपुरी देखभाल, अपघातांमुळे झालेली दुरवस्था यांमुळे सातारा रस्त्यावरील अनेक ठिकाणचे दुभाजक धोकादायक बनले असून, दुभाजकावर वाहने जात असल्याने या भागात दररोज अपघातांची मालिका सुरू आहे. 

दुभाजक बांधताना ते निकषानुसार व पुरेशा उंचीवर बांधलेले नाहीत. अनेक ठिकाणी दुभाजकाचे निकष मोडून चुकीच्या पद्धतीने दुभाजक बांधण्यात आले आहेत. कात्रज ते धनकवडी चौकादरम्यान रस्त्यात चालू असणाऱ्या बांधकामांमुळे अनेक दुभाजकांची मोडतोड झाली आहे. बांधकाम चालू असणाऱ्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले ‘बोर्ड’ चांगल्या अवस्थेत नसल्यामुळे चालकांना अनेकदा हे बोर्ड दिसत नाहीत. त्यामुळे या भागात अपघातांची शक्‍यता वाढली आहे. या मार्गावर बीआरटी असल्याने हा या मार्गाच्या बाजूने छोटे सिमेंटचे दुभाजक लावले आहेत. ते देखील कमी 
उंचीचे आहेत.  

पद्मावती ते सिटीप्राईड चौकादरम्यान असणाऱ्या दुभाजकांची उंची कमी आहे. अपुऱ्या देखभालीमुळे त्यांचा रंग उडाला असून, अनेकदा चालकाला हे दुभाजक दिसून येत नाहीत. विशेषतः रात्री हे दुभाजक दिसत नसल्याने दुभाजकांवर वाहने चढून अपघात झालेले आहेत. 

लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळील चौकापासून सिटीप्राईड चित्रपटगृह चौकाकडे जाताना बीआरटी मार्गावर असणाऱ्या दुभाजकांची उंची कमी असल्यामुळे तसेच त्यांचा रंग उडाल्याने हे दुभाजक चालकांच्या लक्षात येत नाहीत.  
 

औंध ते पुणे विद्यापीठ - दुभाजकामुळे धोकादायक प्रवास 
औंध ते पुणे विद्यापीठ चौकापर्यंतच्या रस्त्यावर जमिनीलगतच दगडी दुभाजक आहेत. अनेकदा या रस्त्यावर अपघातांमधील वाहने दुभाजकावर चढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यावर भुयारी मार्ग, पादचारी पूल किंवा अन्य सुविधाच नसल्यामुळे पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.

औंधच्या पुलापासून शंभर मीटर अंतरापर्यंतच प्लॅस्टिकचे दुभाजक अर्धवट अवस्थेत बसविले आहेत. तरीही वाहने डाव्या बाजूने वळतात. या पट्ट्यात शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यांनाही रस्ता ओलांडण्यास अडचणी येतात. औंध मशीद ट्रस्टपासून ते पं. भीमसेन जोशी सांस्कृतिक भवनापर्यंत जमिनीलगतच दगडी दुभाजक आहेत. त्याचा रंग गेला असून, त्यावर मातीचे थर चढलेले आहेत. औंध पोलिस चौकीपर्यंत रस्ताच अरुंद असल्यामुळे येथील दुभाजक काढून टाकले आहेत. मात्र त्यापुढे सहायक पोलिस आयुक्त कार्यालयासमोरील रस्त्यावर बसविलेले प्लॅस्टिकचे दुभाजक रस्त्यावर पडले आहेत. औंध ते ब्रेमेन चौकापर्यंत नागरिकांना रस्ता ओलांडणे अशक्‍य होत आहे.

ब्रेमेन चौक ते कस्तुरबा झोपडपट्टीपर्यंत पुन्हा जमिनीलगतच दगडी दुभाजक आहेत. त्यावर शोभिवंत झाडे लावली आहेत. अनेकदा या दुभाजकांवर गाड्या चढून अपघात घडले आहेत. कस्तुरबा झोपडपट्टीच्या ठिकाणी असलेल्या वर्तुळाकार चौकात दुभाजकांना वाहने धडकण्याचे प्रकार सातत्याने घडतात. केंद्रीय शाळा, झोपडपट्टी व सोसायट्यांमुळे येथे लोकवस्ती दाट आहे. तरीही ‘राजमार्ग’ असल्याचे कारण सांगत या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा पादचारी पुलाची व्यवस्था केलेली नाही. कस्तुरबा ते राजभवन या रस्त्यावरही जमिनीलगतच दगडी दुभाजक व त्यावर शोभिवंत झाडे लावली आहेत. या रस्त्यावरही दुभाजकांवर गाड्या चढून त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. बाल कल्याण संस्थेच्या समोरच गतिरोधकबरोबरच दुभाजक आहे. अनेकदा वाहने या ठिकाणाच्या दुभाजकावरूनच वळण घेतात. त्यामुळे भविष्यात अनुचित घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. राजभवनापर्यंत हीच स्थिती आहे. एकूणच या रस्त्यावरही पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यादृष्टीने कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. मोठे, उंच व रूंद दुभाजकांची आणि पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावे, अशी व्यवस्था करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

कर्वे रस्ता  - कमी उंचीचे दुभाजक धोक्‍याचे 
प्रवासी वाहतूक आणि खासगी वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या कर्वे रस्त्यावरील दुभाजकही सुरक्षिततेच्या दृष्टीने तोकडाच आहे. या रस्त्यावरील पौड फाटा ते खंडुजीबाबा चौकापर्यंत जेमतेम एक फूट उंचीचे दुभाजक उभारण्यात आले आहेत. परिणामी, सुसाट येणाऱ्या वाहनांमुळे दुभाजक तुटण्याची भीती आहे. तर, कमी उंचीच्या दुभाजकामुळे पादचारी आणि प्रवासी सर्रास रस्ता ओलांडत असल्याचे दिसून आले आहे. 

या रस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्यांसह, खासगी बसगाड्या आणि अन्य वाहने ये-जा करीत असतात. त्यात, बसगाड्यांची संख्या अधिक असल्याचेही दिसून येते. सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्यावर सक्षम म्हणजे, किमान दोन ते अडीच फूट उंचीचे आणि मजबूत दुभाजक उभारणे गरजेचे आहे. मात्र, एवढ्या वाहनांची वर्दळ असूनही त्या रस्त्यावर सक्षम दुभाजक उभारलेले नाहीत. दिवसभरात वाहने वेगाने ये-जा करीत नाहीत, त्यामुळे सध्या अस्तित्त्वात असलेला दुभाजक पुरेसे असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ, त्याचे स्वरूप आणि संख्या लक्षात घेता दुभाजकाचे नियोजन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खडी मशिन चौक ते कात्रज चौक - सर्वेक्षण करून उपाय व्हावेत

खडी मशिन चौक ते कात्रज चौकापर्यंत रस्त्यावरील दुभाजकांची स्थिती बघितल्यानंतर आपण पुण्यातच आहोत का, असा प्रश्‍न मनाला पडल्याशिवाय राहात नाही. या रस्त्यावर बऱ्याच अंतरापर्यंत दुभाजक नाहीत. आहेत त्या ठिकाणच्या दुभाजकांची स्थिती दयनीय असून, ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहेत. खडी मशिन चौक ते कात्रज चौक हा रस्ता धोकादायक बनला आहे. अपघात टाळण्यासाठी या रस्त्याचे संपूर्ण सर्वेक्षण करून आवश्‍यक ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
उंड्री-पिसोळी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. या रस्त्यावरील खड्‌डे पार करून खडी मशिन चौकात आल्यानंतर अवजड वाहनांमुळे कोंडी झालेल्या या चौकातून कसाबसा मार्ग काढावा लागतो. तेथील सिग्नल बंद आहेत. पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन योग्य पद्धतीने केले जात नाही. शिवाय येथील दुभाजकामुळे अपघाताचीच शक्‍यता अधिक आहे. तेथून इस्कॉन मंदिरापर्यंत दुभाजकच नाहीत. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध पिवळी पट्टी मारलेली दिसून येते. इस्कॉन मंदिराच्या पुढे कात्रजच्या दिशेने येताना गोकूळनगरपर्यंत दुभाजक आहे. परंतु या दुभाजकाची स्थिती खराब झालेली आहे. या रस्त्यावरील गोकूळनगर, शिवशंभोनगर आणि माऊलीनगर भागात दुभाजकच नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.

या रस्त्यावर अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. तसेच रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. रात्री अंधार असल्यामुळे दुभाजक कोठे सुरू होतात, हेच कळत नाही. महापालिकेकडून दुभाजकांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघाताची शक्‍यता बळावली आहे.

सोलापूर रस्ता  - बीआरटी मार्गाचे दुभाजक गायब 
सोलापूर रस्त्यावरील चौकाचौकांत पेवर ब्लॉकचे कमी उंचीचे दुभाजक असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक त्यावर उभे राहतात. ये-जा करणाऱ्या वाहनांचा तेथून अंदाज घेतात. त्यानंतर ते जीव धोक्‍यात घालून रस्ता पार करतात. कमी उंचीच्या दुभाजकांचा आधार मिळत असल्यानेच नागरिक रस्ता पार करण्याचे जीवघेणे धाडस करीत असल्याचे मंगळवारी सकाळी आढळून आले.

पीएमपीच्या कार्यालयाजवळील नटराज चौक, आझम कॅम्पसजवळील चौक, भैरोबानाला चौक, रामटेकडी चौक, वैदूवाडी चौक, वैभव टॉकीजजवळील चौक आदी ठिकाणी धोकादायक दुभाजक आहेत. नागरिक या दुभाजकांवरून सर्रास रस्ता पार करीत आहेत. वैदूवाडी चौकाजवळील दुभाजकावरील रिफ्लेक्‍टर गायब झाले आहेत. त्यामुळे वेगात येणाऱ्या वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. तसेच रामटेकडी चौकाजवळ क्रोम इमारतीच्या बाजूने हडपसरकडे जाताना चौकातून बीआरटीचा मार्ग सुरू होतो. त्या वेळी दुभाजक स्पष्टपणे दिसत नसल्याने वाहने दुभाजकाला धडकून त्यात अडकल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हडपसर पोलिस ठाण्यापासून सुरू होणारा उड्डाण पूल वैभव टॉकीजनजिक संपतो. तो संपताना तीव्र उतार आहे. नेमके याच ठिकाणी धोकादायक दुभाजक आहे. या ठिकाणी अचानक समोर येणाऱ्या दुभाजकाचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने अपघात होण्याची भीती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com