तु्म्हीच सांगा, अशा शाळेत शिकायचं तरी कसं?

विजय जाधव
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

भोर तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या 30 शाळांच्या इमारती या वर्षीच्या अतिवृष्टी, पूर व वादळामुळे दुरवस्था होऊन धोकादायक झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने त्वरित इमारतींची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक करत आहेत. 
 

भोर (पुणे) : तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या 30 शाळांच्या इमारती या वर्षीच्या अतिवृष्टी, पूर व वादळामुळे दुरवस्था होऊन धोकादायक झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने त्वरित इमारतींची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक करत आहेत. 

भोर तालुक्‍यात मुसळधार पावसामुळे वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे जाणे, छप्पर व पत्रे उडणे, स्लॅब गळणे, दरवाजे व खिडक्‍या पडणे, शाळेवर झाडे कोसळणे व किचन शेड उडून जाणे, आदी घटना घडल्या आहेत. या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत. पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत सर्वेक्षण करून तालुक्‍यातील 28 शाळांमधील 51 वर्गखोल्या आणि 2 शाळांच्या संरक्षण भिंतींची दुरुस्ती तत्काळ करणे गरजेचे आहे. 

या इमारतींच्या दुरुस्तीसाठीचा 1 कोटी 49 लाख 89 हजार 732 रुपये खर्चाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. परंतु, अद्यापही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या ठिकाणच्या शाळेतील विद्यार्थी अंगणवाडी, मंदिर व समाजमंदिरासारख्या पर्यायी जागेत शिक्षण घेत आहेत. गोकवडी व चिखलगाव येथील शाळेच्या इमारतींची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. कारी- चौका व निधान सांगवी येथील शाळांच्या संरक्षण भिंती धोकादायक झाल्या आहेत. 

इमारती धोकादायक झालेल्या शाळा पुढीलप्रमाणे ः टिटेघर, मोहरी बुद्रूक- धनगरवस्ती, मालुसरे वस्ती, गोकवडी, राजीवडी, चिखलावडे, मळे, धानिवली, कासुर्डी गुमा, चिखलगाव, पसुरे, वर्पेवाडी, शिळींब, नानावळे, येवली, कोर्ले- जांभूळवाडी, नऱ्हे, बुवासाहेबवाडी, वागजवाडी, वागजवाडी- सिद्धेश्‍वरनगर, वडगाव डाळ, महुडे खुर्द, हातवे खुर्द, उत्रौली, पसुरे- सणसवाडी, अंगसुळे, तेलवडी व पान्हवळवाडी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous of school buildings in Bhor taluka