दापोडी-निगडी सेवा रस्ता बनलाय धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

पिंपरी - चुकीच्या दिशेने (नो एंट्रीतून) येणारी वाहने, प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या रिक्षा आणि खासगी प्रवासी कंपनीच्या बस, अशा अनेक कारणांमुळे दापोडी ते निगडीदरम्यानच्या सेवा रस्त्यावर आठ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे तयार झाली आहेत. मेट्रोच्या कामामुळे दापोडी ते मोरवाडी चौकादरम्यान रस्त्यावर सात ठिकाणी, तर निगडीतील भक्‍ती शक्‍ती चौक परिसरात उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतुकीत विस्कळितपणा आला असून, त्या ठिकाणी अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

पिंपरी - चुकीच्या दिशेने (नो एंट्रीतून) येणारी वाहने, प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या रिक्षा आणि खासगी प्रवासी कंपनीच्या बस, अशा अनेक कारणांमुळे दापोडी ते निगडीदरम्यानच्या सेवा रस्त्यावर आठ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे तयार झाली आहेत. मेट्रोच्या कामामुळे दापोडी ते मोरवाडी चौकादरम्यान रस्त्यावर सात ठिकाणी, तर निगडीतील भक्‍ती शक्‍ती चौक परिसरात उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतुकीत विस्कळितपणा आला असून, त्या ठिकाणी अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

दापोडी ते मोरवाडी चौकदरम्यान फुगेवाडी चौकातील सिग्नल लगत एमएनजीएलचा पंप आहे. तेथे गॅस भरण्यासाठी चुकीच्या दिशेने वाहने येतात. बऱ्याचदा सिग्नल सुटल्यानंतर पुण्याकडून येणारी वाहने वेगात असतात. त्यातच गॅस भरण्यासाठी थांबलेल्या वाहनांची रांग चौकापर्यंत आलेली असते. त्यामुळे या परिसरात अनेक किरकोळ अपघात होतात. 

मेट्रोचे काम सुरू असल्याने फुगेवाडी परिसरातील ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. मात्र, येथील एका हॉटेल बाहेर अनधिकृतपणे उभी असलेली वाहने, बीआरटी मार्गातून येणाऱ्या बस आणि भुयारी मार्गामधून वळणारी वाहने यामुळे वाहतूक कोंडी होते. फोबर्ज मार्शल कंपनीसमोर सेवा रस्त्यावरून ग्रेडसेपरेटरकडे जाण्यासाठी बीआरटी मार्गाचा काही भाग खुला करण्यात आला आहे. परिणामी बीआरटीमधून येणाऱ्या बस आणि सेवा रस्त्यावरून ग्रेडसेपरेटरकडे जाणारी वाहने यांच्यात गोंधळ उडत असल्याने हा परिसर अपघातप्रवण बनला आहे. 

शंकरवाडी चौकाच्या परिसरात भुयारी मार्गामधून येणारी वाहने आणि मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावर थांबलेले रिक्षाचालक यामुळे होणाऱ्या कोंडीतून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. कासारवाडी परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतुकीची परिस्थिती गंभीर बनली असतानाच सेवा रस्त्यावर झालेले अतिक्रमण, रेल्वे स्टेशन बाहेर थांबणारे रिक्षाचालक आणि रस्त्यावरील खड्‌डे यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला  आहे. 

पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मोरवाडी चौकात याच समस्या भेडसावत आहेत. उड्डाण पुलाच्या कामामुळे निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकातील वाहतूक विस्कळित होते. मुळातच चौकालगत झालेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच उलट्या बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्यादेखील 
मोठी आहे. 

दापोडी ते निगडी दरम्यानच्या सेवा रस्त्यावर नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात होत असते. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी लवकरच कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासंदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती, त्यामध्ये काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
- नीलिमा जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्‍त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड.

Web Title: Dapodi-Nigdi service road is dangerous