दापोडी समांतर पुलांचे बजेट एक कोटीने वाढले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पिंपरी - हॅरिस पुलावर होणारी वाहतूक कोंडीचा त्रास लवकरच कमी होणार आहे. या ठिकाणी सुरू असणाऱ्या दोन समांतर पुलांचे काम वेगात सुरू आहे. येत्या दीड वर्षामध्ये ते पूर्ण होणार आहे. पाटबंधारे खात्याने या पुलाचे काम पूररेषेच्या बाहेरून करण्याचे सांगितल्याने त्याची लांबी १३ मीटरने वाढणार आहे. याखेरीज एकूण प्रकल्पाच्या खर्चात सुमारे एक कोटी रुपयांची वाढ होणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी ‘सकाळ‘ला सांगितले. 

पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पुलाच्या कामात झालेल्या नव्या बदलामुळे या प्रकल्पाच्या रकमेत एक कोटी रुपयांची वाढ होणार असून, हा प्रकल्प २५ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने पिंपरी-चिंचवड महापालिकेला १२ कोटी १७ लाख रुपये दिले आहेत. 

पिंपरी-चिंचवडहून येणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी आणि पुण्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी या ठिकाणी दोन स्वतंत्र पूल उभारण्यात येणार आहेत. या पुलाची लांबी पूर्वी १०३ मीटरची होती. आता ती ११६ मीटरची राहणार आहे. सध्या असणाऱ्या हॅरिस पुलाच्या बाजूने हे दोन्ही पूल राहणार आहेत. पावसाळा सुरू होण्याअगोदर दोन्ही पुलांचा पायाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या त्या ठिकाणी सुपर स्ट्रक्‍चर उभे करण्याचे काम सुरू असल्याचे सवणे यांनी स्पष्ट केले. 

आताच्या परिस्थिती दोन्ही पुलांचे २० ते २५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. सध्या सुरू असणारा वेग असाच कायम राहिल्यास पुढल्या वर्षीच्या पावसाळ्याअगोदर या दोन्ही पुलांचे काम पूर्ण होऊन ते वाहतुकीसाठी खुले होतील, असा विश्‍वास सवणे यांनी व्यक्‍त केला. या पुलाच्या उभारणीसाठी ग्रिडल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पुलाच्या बांधणीसाठी विशेष स्टील मटेरिअल वापरण्यात येणार आहे. 

वाहतूक कोंडी होणार कमी 
सध्या पिंपरी-चिंचवडमधून हॅरिस पुलापर्यंत पोचण्यासाठी कमी वेळ लागत असला, तरी वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना या पुलावर ३० ते ४० मिनिटे अडकून पडावे लागते. या दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर इथे होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे कमी होणार आहे. 

Web Title: Dapodi parallel Bridge budget has increased by one million