सुदृढ तळेगावसाठी लायन्सची अद्ययावत जीम 

गणेश बोरुडे
रविवार, 1 जुलै 2018

तळेगाव स्टेशन : भरमसाठ फी आकारुन सुविधा देणार्या शहरातील जीमच्या धर्तीवर तळेगाव दाभाडे सारख्या निमशहरी भागातही लायन्स क्लबने अदयावत आणि अत्याधुनिक जीम उभारली आहे. याबद्दल जीमचे प्रवर्तक लायन्स सुनिल जैन यांना पुणे विभागातील सर्वोत्कृष्ट स्थायी प्रकल्प पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

तळेगाव स्टेशन : भरमसाठ फी आकारुन सुविधा देणार्या शहरातील जीमच्या धर्तीवर तळेगाव दाभाडे सारख्या निमशहरी भागातही लायन्स क्लबने अदयावत आणि अत्याधुनिक जीम उभारली आहे. याबद्दल जीमचे प्रवर्तक लायन्स सुनिल जैन यांना पुणे विभागातील सर्वोत्कृष्ट स्थायी प्रकल्प पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

आजकाल तरुणांमध्ये व्यायामशाळेत जाण्याचे फॅड वाढल्याचे दिसते. शहरी भागांत भरमसाठ फी आकारुन चांगल्या जीमच्या सुविधा उपलब्ध असल्या तरी, ग्रामीण भागात मात्र त्यातुलनेत सुविधा नसल्याने अथवा आर्थिक कुवतीअभावी तरुणाई व्यायामापासून वंचित आहे.याच पार्शवभूमीवर गेली पंचेचाळीस वर्षे निष्काम सेवेचा वारसा जपणाऱ्या लायन्स क्लबने तळेगावात लोकसहभागातून जवळपास १ कोटी रुपये खर्चून अद्ययावत अशी जीम उभारली आहे. कडोलकर कॉलनीतील लायन्स क्लबच्या इमारतीमध्ये ४ हजार स्क्वेअर फुटांच्या एल आकारात अॅरोबिक्स, ऑर्बिट्रेक, कार्डिओ मशीन,स्पिन बाईक, पॉवर केज, स्मिथ मशीन, झुंबा, ट्रेडमिल, डंबेल्स आदी व्यायाम साहित्याची सोय करण्यात आली असून, इतरही अत्याधुनीक व्यायामाची साधने येथे लावण्यात आली आहेत. महिलांसाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. व्यायामाचे प्रशिक्षण देण्यासाठी पुरुष आणि महिला प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत. आज चारशेच्या वर पुरुष आणि जवळपास ६० महिला या जीमचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे भरमसाठ शहरी जीम फीच्या तुलनेत केवळ आस्थापना, व्यवस्थापन, प्रशिक्षकांचा पगार आणि देखभाल खर्चाची सरासरी वसूल होईल एवढ्या नाममात्र प्रवेशशुल्कावर ना नफा ना तोटा या तत्वावर ही सुविधा तळेगावकरांना उपलब्ध करण्यात आली आहे. मावळसारख्या ग्रामीण भागातील पहिले वुडन बॅडमिंटन वूडन कोर्टही इथे उभारण्यात आले आहे. लायन्सला नगरपालिकेने दिलेल्या दिड एकर जागेवर साकारलेल्या चिल्ड्रेन्स पार्क, नाना नानी पार्कचा लाभ समस्त अबालवृद्ध वर्षनुवर्षे घेत आहेत. याबरोबरच घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य इथे विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

स्व.जेएच कावले आणि मुकुंदराव खळदे यांनी लावलेल्या लायन्सच्या या समाजसेवी रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होण्याकामी काम डॉ. शाळीग्राम भंडारी, चंद्रकांत खळदे, दिपक शाह, सुरेश जाधव, डॉ. दिलीप भोगे, नंदकुमार हरगापूरे आदींचा मोलाचा वाटा आहे. सदर अद्ययावत जीमचे शिल्पकार तथा लायन्स क्लब तळेगावचे अध्यक्ष सुनील जैन यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुणे-नगर-नाशिक विभागात सर्वोत्कृष्ट स्थायी प्रकल्पाचा प्रथम पुरस्कार लायन्सचे आंतराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी आणि पुणे प्रांतपाल गिरीश मालपाणी यांच्या हस्ते नुकताच संगमनेर येथे प्रदान करण्यात आला.

 

Web Title: up to date gym for healthy Talegaon