जुलैमध्ये देणार राजीनामा - साने

Datta-Sane
Datta-Sane

पिंपरी - ‘विरोधी पक्षनेतेपदासाठी आणखी दोन महिने मुदतवाढ द्या,’’ अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, त्यांची ही मागणी धुडकावून त्यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षातर्फे देण्यात आले. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण राजीनामा देणार असल्याची माहिती साने यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदी दरवर्षी एका नगरसेवकाला संधी देण्याचे निश्‍चित केले आहे. पहिल्या वर्षी योगेश बहल यांना संधी मिळाली होती. आता सानेंचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर या पदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे साने यांनी राजीनामा घ्यावा, अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना केली.

‘‘विरोधी पक्षनेतेपदी असताना आपण सत्ताधारी भाजपला सळो की पळो करून सोडले. यातून आपल्या कार्यालयावर हल्ला झाला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण केल्याने इच्छुकांनी दोन महिने थांबावे,’’ असे आवाहन साने यांनी केले. मात्र, साने यांच्या आवाहनामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुकांनी वेगाने हालचाली करीत राजीनाम्यासाठी दबाव निर्माण केला. 

दरम्यान, साने यांनी अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. तुम्ही राजीनामा द्या, असा निरोप त्यांना आला. सध्या साने परदेशात आहेत. तेथून परतल्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com