आंबेगावच्या कन्येमुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक 

kajal bhor
kajal bhor

निरगुडसर (पुणे) : भारतीय महिला खो- खो संघात समावेश असलेली आंबेगावची कन्या काजल तुकाराम भोर हिने अंतिम सामन्यात यजमान नेपाळ संघाचे तब्बल पाच खेळाडू अचूक टिपल्याने भारताचा विजय सुकर झाला. महाराष्ट्रासाठी 14 सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या काजल हिने आपल्या देशासाठी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय मैदान गाजवल्याने सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. 

काठमांडू (नेपाळ) येथे दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत खो- खोमध्ये भारतीय पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही सुवर्णपदकाची कमाई केली. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा 17- 5 असा 1 डाव 12 गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय महिला संघाकडून आक्रमणात काजल भोर हिने 5 खेळाडूंना बाद करत विजय सुकर केला. 

रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाची सदस्य असलेल्या काजल हिला खो- खो प्रशिक्षक संदीप चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तिने जवळपास 14 राष्ट्रीय स्पर्धा खेळून महाराष्ट्र संघाला 14 सुवर्णपदक मिळवून दिले आहेत. तसेच महाराष्ट्र महिला संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे. खेलो इंडियाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळवून दिले. राष्ट्रीय खो- खो स्पर्धेतील यंदाचा देशपातळीवरील प्रतिष्ठेचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार तिला मिळवला आहे. 

या यशाबद्दल काजल हिचे भारतीय खो- खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी, सहसचिव चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव संदीप तावडे, प्रशिक्षक संदीप चव्हाण यांच्यासह विविध स्तरातून अभिनंदन केले आहे. 
 

खो- खो खेळातून महाराष्ट्राला 14 सुवर्णपदक मिळवून दिली. त्यानंतर आपल्या भारतीय संघात स्थान पटकावून देशासाठी सुवर्ण कामगिरी करण्याचे स्वप्न होते. अशी दोन्ही स्वप्न पूर्ण झाली. देशासाठी सुवर्णपदक पटकावल्याचा आनंद खूप मोठा आहे. या पुढेही देशासाठी अनेक सुवर्णपदक पटकावण्याचा मानस आहे. 
- काजल भोर 
 
रांजणी येथे 12 वर्षांपूर्वी नरसिंह क्रीडा मंडळाची स्थापना केली. आतापर्यंत अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार झाले. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे पाहिलेले स्वप्न काजल हिच्या रूपाने सत्यात उतरले आहे. जिद्द व चिकाटीमुळे तिला हे यश मिळाले आहे. रयत शिक्षण संस्था, नरसिंह क्रीडा मंडळ, पालक व ग्रामस्थ यांचेही सहकार्य आहे. 
- संदीप चव्हाण, 
खो- खो प्रशिक्षक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com