संजय शिंदेने केला होता आणखी तिघांना फोन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

दौंड - दौंड शहरात जुगार आणि सावकारीच्या पैशावरून झालेल्या वादातून तिघांचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय शिंदे याने आणखी तीन खासगी सावकारांना मोबाईलवरून फोन केला होता; परंतु ते न सापडल्याने बचावले. संजय शिंदे याने गोपाल शिंदे, परशुराम पवार व विलास जाधव यांचा खून केल्यानंतर मोबाईलवरून एका सावकाराला फोन करून धमकी दिली. त्या सावकाराने थेट दौंड पोलिस ठाणे गाठल्याने तो बचावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे याने आनंद अण्णाराव जाधव (वय 40, रा. दौंड) या सावकाराकडून पंचवीस हजार रुपये उसने घेतले होते. आनंद याने पैशासाठी तगादा लावल्याने संजय त्रस्त होता. त्याला गोपाल शिंदे याच्याकडून दहा हजार रुपये येणे होते. 16 जानेवारीला रोजी संजय शिंदे व गोपाल शिंदे यांच्यात त्यावरून बाचाबाची झाल्यानंतर नगर मोरी चौकात संजय शिंदे याने गोपाल शिंदे व परशुराम पवार यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संजय याने मोबाईलवरून अनिल जाधवशी संपर्क साधला. त्याच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडून खून केला.

त्यानंतर त्याने आनंद अण्णाराव जाधव याला दूरध्वनी करून "तुझे पैसे परत करायचे आहेत, तू कुठे आहे?,' असे विचारले होते; परंतु आनंदला नगरमोरी येथे दोघांचा गोळ्या झाडून खून झाल्याची माहिती मिळाल्याने त्याने आपण दौंडमध्ये नसल्याचे सांगितले आणि जीव वाचविण्यासाठी दौंड पोलिस ठाण्याचा आश्रय घेतला.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले, की नगरमोरी चौकात दोन खून केल्यानंतर संजय शिंदेने मोबाईलवरून आनंद जाधव याला उसन्या पैशांवरून शिवीगाळ करत धमकी दिली, अशी आशयाची तक्रार जाधव याने 16 जानेवारीला दिली. ती अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात आली आहे. तक्रार दिल्यानंतर जाधव हा बराच वेळ पोलिस ठाण्यात बसून होता, अशी माहिती पोलिस कर्मचाऱ्यांनी मला दिली. संजय शिंदेने गोळ्या झाडण्यापूर्वी व झाडल्यानंतर कोणाशी मोबाईलवरून संपर्क साधला होता, हे तपासात निष्पन्न होईल.

शासकीय सेवेतून निलंबित
इंडियन रिझर्व्ह बटालियनचे समादेशक खुशाल सपकाळे यांनी संजय बळिराम शिंदे यास शासकीय पिस्तुलाचा वापर करून तीन जणांचा खून केल्याप्रकरणी अटक झाल्याने 17 जानेवारी 2018 पासून शासकीय सेवेतून निलंबित केले आहे, अशी माहिती भगवान निंबाळकर यांनी दिली.

Web Title: daund pune news murder case