दौंडमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

दौंड (जि. पुणे) - दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाने जुगाराच्या पैशांवरून झालेल्या वादातून दोन ठिकाणी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

दौंड (जि. पुणे) - दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाने जुगाराच्या पैशांवरून झालेल्या वादातून दोन ठिकाणी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

दौंड शहरातील नगर मोरी चौकात सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय ब. शिंदे याची आज (ता. 16) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जुगाराच्या पैशांवरून परशुराम पवार व गोपाळ शिंदे यांच्यासोबत जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर दुचाकीवर असलेल्या संजय शिंदे याने दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या परशुराम गुरुनाथ पवार (वय 33, रा. वडारगल्ली, दौंड) आणि गोपाळ काळुराम शिंदे (वय 35, रा. वडारगल्ली, दौंड) यांच्या डोक्‍यात गोळ्या घालून त्यांना ठार केले. त्यानंतर संजय शिंदे हा दौंड- कुरकुंभ रस्त्यालगत असलेल्या चोरमले वस्ती येथे गेला. तेथे अनिल विलास जाधव (वय 30, रा. चोरमले वस्ती, गोपाळवाडी, ता. दौंड) यास बंगल्यातून बाहेर बोलविले. तेथे बंगल्याच्या दारातच त्याला गोळ्या घालून ठार केले.

दरम्यान, संजय शिंदे याला सुपे (ता. पारनेर, जि. नगर) येथे अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांनी दौंड येथे दिली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सायंकाळी पावणेआठ वाजता शहरात येऊन घटनास्थळांची माहिती घेऊन तपासाचा आढावा घेतला.

वाघुंडे शिवारात पकडले
पारनेर - दौंड येथे गोळीबार करून फरार झालेल्या संजय शिंदे याला सुपे पोलिसांनी आज सायंकाळी सहाच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील वाघुंडे (ता. पारनेर) शिवारात पाठलाग करून पकडले. शिंदे यामे दौड येथे तिघांवर गोळीबार करून घरात लपल्याच्या संशयावरून त्याच्या घराला पोलिसांनी वेढा घातला होता. मात्र पोलिसांना चकवा देत तो पसार झाला होता. नंतर तो पुण्याकडून नगरच्या दिशेने येत असल्याचे खबऱ्यामार्फत पोलिसांना समजले. त्यानुसार सुपे टोलनाक्‍यावर पोलिसांनी पाळत ठेवलली. मात्र तेथेही त्याने पोलिसांना चकवा दिला. तेथून नगरकडे जाऊ लागला. सुपे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील, सुखदेव दुर्गे, बबन मखरे, शिवाजी कडूस, यशवंत ठोंबरे आदींच्या पथकाने पाठलाग करत वाघुंडे शिवारात त्याची गाडी अडवून त्याला पकडले.

संशयित शस्त्रागार विभागात कार्यरत
या प्रकरणातील संशयित मारेकरी सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय ब. शिंदे हा कोल्हापूर येथील इंडियन रिझर्व्ह बटालियनमध्ये नेमणुकीस असून, सध्या तो दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या शस्त्रागार विभागात कार्यरत होता.

Web Title: daund pune news three death in firing