दौंड - पुणे शटलचे 3 डबे कमी केल्याने प्रवाशांचे हाल  

DND
DND

दौंड (पुणे) : दौंड - पुणे शटलचे तीन प्रवासी डबे कमी केल्याने दोन दिवसांपासून प्रवाशांचे हाल होत आहेत. तेरा ऐवजी दहा डबेच जोडल्याने प्रवाशांना दाटीवाटीने उभे राहून प्रवास करावा लागत आहे. 

दौंड रेल्वे स्थानकावरून शटल दररोज सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी रवाना होऊन पुणे स्थानकावर सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी दाखल होते. 25 व 26 नोव्हेंबर रोजी शटलसाठी दौंड येथून फक्त दहा डबे जोडण्यात आले. तब्बल तीन डबे कमी असल्याने प्रवाशांना थंडीत उभे राहून प्रवास करावा लागला. दौंडसह या मार्गावरील पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी, हडपसर येथून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागला. एका डब्यात सरासरी 72 प्रवासी बसू शकतात, परंतु प्रत्यक्षात बाकड्यांवर, दाराजवळ, ये - जा करावयाच्या मार्गावर आणि बाकड्यांवरील सामान ठेवण्याच्या स्टॅण्डवर किमान 120 ते 130 प्रवासी दररोज प्रवास करतात. 
प्रत्येक डब्यात क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी दररोज प्रवास करीत असताना मध्य रेल्वेच्या पुणे विभाग प्रशासनाने मनमानी पद्धतीने डबे कमी केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दौंड - पुणे प्रवासी संघाने प्रशासनाकडे तातडीने तेरा डब्यांचा रेक जोडण्याची मागणी केली. 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दौंड रेल्वे स्थानक समाविष्ट आहे, तर दौंड - पुणे शटलचा रेक हा पुणे रेल्वे विभागाच्या अंतर्गत आहे. शटलच्या डब्यांची देखभाल, दुरुस्ती व नियमित तपासणी ही पुणे विभागाकडून केली जाते. परतीच्या प्रवासात सकाळी 7 वाजून 5 मिनिटांच्या शटलचा रेक रात्री पुणे येथून प्रवासी गाडीच्या रूपाने दौंड मुक्कामी येतो. दौंड येथे प्राथमिक तपासणी व आवश्‍यक देखभाल करून सकाळी पुन्हा हा रेक पुण्याकडे रवाना होतो. 
 
डबे पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न 
दौंड स्थानकाचे व्यवस्थापक सॅम्यूएल क्‍लिफ्टन म्हणाले, ""आज दहा डब्यांचा रेक शटलसाठी जोडण्यात आला होता. तेरा डबे पूर्ववत करण्यासंबंधी पुणे विभागाच्या संबंधित वरिष्ठांकडे प्रयत्न सुरू आहेत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com