दौंड (पुणे) : दोन लाखांचे सोने चोरट्याकडून हस्तगत 

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

दौंड (पुणे) : पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बख्श महंमद ईस्माईल (वय १९) या युवकास दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख १९ हजार रूपये मूल्य असलेले एकूण साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दौंड (पुणे) : पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बख्श महंमद ईस्माईल (वय १९) या युवकास दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख १९ हजार रूपये मूल्य असलेले एकूण साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी सोमवारी (ता. २४) या बाबत माहिती दिली. ७ एप्रिल २०१८ ते २२ ऑगस्ट २०१८ दरम्यान चार प्रवासी गाड्यांमध्ये मध्यरात्री पावणेतीन ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान या चोर्या झाल्या होत्या. रामस्वरूप शर्मा (वय ६८, रा. शिवपूरी, मध्य प्रदेश) हे ७ एप्रिल रोजी गोवा एक्सप्रेसने पुणे ते झाशी असा प्रवास करीत असताना पुणे ते दौंड दरम्यान त्यांच्या ताब्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. ६ जून रोजी श्वेता किशोर चौधरी (वय २१, रा. बोदवड, जि. जळगाव) या महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करीत असताना गाडी दौंड रेल्वे स्थानकावर थांबली असता त्यांची ७ ग्रॅमची सोन्याची साखळी चोरीस गेली होती. २ जुलै रोजी टी. सुधाकर (वय ५७, रा. सिरूगुप्पा, जि. बेल्लारी, कर्नाटक) हे बेंगळुरू - अहमदाबाद एक्सप्रेसने प्रवास करीत असताना सदर एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानकावर थांबली असता चोरट्याने त्यांच्याकडील १० ग्रॅमची सोन्याची साखळी व रोख नऊ हजार रूपये चोरीस गेले होते. २२ आॅगस्ट रोजी अजय भगवान दोंदे (वय ३५, रा. वालधुनी, कल्याण पश्चिम) हे हुसेनसागर एक्सप्रेसने प्रवास करीत असताना सदर एक्सप्रेस जिंती (जि. सोलापूर) रेल्वे क्रॅासिंग साठी थांबली असता चोरट्याने त्यांच्याकडील एकूण ४४ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख पंचेचाळीस हजार रूपये चोरीस गेले होते. या प्रकरणी श्वेता चौधरी यांनी ईमेल द्वारे तक्रार दिली होती तर अन्य तिघांनी विविध रेल्वे स्थानकांवर दिलेल्या तक्रारी तपासासाठी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्या होत्या.

लोहमार्ग पोलिसांनी अल्लाह बख्श महंमद ईस्माईल (रा. टीपू सुलतान नगर, गुलबर्गा, कर्नाटक ) यास एका चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने या चोर्यांची कबुली दिली. गुलबर्गा येथे त्याच्या घरावर पोलिस पथकाने धाड टाकून ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक दीपक साकोरे, अतिरिक्त अधीक्षक तुषार पाटील, उप अधीक्षक नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दीपक बाळेकुंद्री यांच्यासह चंद्रकांत गायकवाड, अनील टेके, आनंद वाघमारे, संजय पाचपुते, संतोष कांबळे व सुनील गोयेकर या पोलिसांनी या कारवाईत भाग घेतला, अशी माहिती सुरेशसिंग गौड यांनी दिली.

Web Title: Daund (Pune): Two lakhs worth of gold snatching