दौंडमध्ये कालव्याला धोका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

कुरकुंभ - खडकवासला कालव्याचे काम होऊन अनेक वर्षे झाली आहेत. दौंड तालुक्‍यात ठिकठिकाणी पाणी पुढे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गांचे बांधकाम खिळखिळे झाले आहे. त्यामुळे कालव्यातून पाण्याची गळती होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या गळतीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात कालवा फुटण्याचा धोका संभवतो. त्यामुळे कालवा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पानशेत, वरसगाव, खडकवासला धरणाचे पाणी इंदापूर, दौंड, हवेली तालुक्‍यातील शेतीला उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने खडकवासला धरणापासून दोनशेपेक्षा जास्त किलोमीटर लांबीचा कालवा तयार करण्यात आला आहे. हा कालवा मुरूम व मातीचा वापर करून बनविण्यात आला आहे. त्यासाठी काही ठिकाणी पाण्यासाठी सिमेंटचे बांधकाम केलेले भुयारी मार्ग व पूल तयार केले आहेत. मात्र, या कालव्याच्या कामाला पंचवीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. त्यामुळे कालव्याचा भराव कमकुवत झाला असून, मोरी व पुलाची बांधकामे खिळखिळी झाली आहेत. काँक्रीटच्या अस्तरीकरणाला भेगा, भगदाडे पडल्याने पाणीगळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक पाण्याच्या आवर्तनाला पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाण्याची गळती होत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय वाढत आहे. या गळतीसंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत असून, अनेक वेळा कालवा फुटून पाण्याचा अपव्यय होऊनही दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नाव दुरुस्तीचे, काम मलिदा खाण्याचे
यापूर्वी सरकारने खडकवासला कालव्याच्या किरकोळ दुरुस्ती, गाळ काढणे, झाडेझुडपे काढण्यासाठी अनेक वेळा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, ठेकेदारांनी तात्पुरती डागडुजी व गाळ काढण्याची कामे करून अधिक मलिदा खाण्याचे काम केले आहे. यापैकी काही कामे निकृष्ट झाल्याने सरकारच्या पैशाचा अपव्यय झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भविष्यात सरकारने कालव्याच्या किरकोळ दुरुस्तीसाठी निधी न देता भरीव निधी उपलब्ध करून संपूर्ण कालव्याची दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता आहे.

तक्रार करूनही उपाययोजनांकडे दुर्लक्ष
यापूर्वीही काही ठिकाणी कालव्याचा भराव फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. कालवा फुटण्याची एखादी मोठी घटना घडल्यास बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे इत्यादींचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कालवा दुरुस्तीच्या कामासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सध्या दुरुस्तीच्या कामाला कमी प्रमाणात खर्च होऊ शकतो. मात्र, भविष्यात कालवा फुटल्याची घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान व खर्चाला सामोरे जावे लागेल. पाणीगळती व दुरुस्तीसंदर्भात अनेक शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून आले आहे.

Web Title: daund water canal danger