दौंड: ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाजपठण

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 16 जून 2018

दौंड(पुणे) - 'मौला नेक बना, एक बना` अशी प्रार्थना दौंड शहरातील शाही आलमगीर मशिदीचे मौलाना नुमान रझा यांनी रमझान ईद निमित्त केली. 

दौंड(पुणे) - 'मौला नेक बना, एक बना` अशी प्रार्थना दौंड शहरातील शाही आलमगीर मशिदीचे मौलाना नुमान रझा यांनी रमझान ईद निमित्त केली. 

दौंड शहरात आज (ता. १६) रमजान ईद निमित्त सकाळी भीमा नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठणानंतर धर्मसंदेश देताना मौलाना नुमान रझा यांनी हे आवाहन केले. ते म्हणाले, ''रमजानच्या काळात आणि दैनंदिन जीवनात आपणाकडून कळत - नकळतपणे जे अपराध झाले आहेत त्यासाठी क्षमा मागावी आणि इतरांना त्यांच्या कृत्यांसाठी क्षमा करावे. इस्लामच्या अनुयायांनी एकोप्याने राहावे. जीवनात ज्या क्षेत्रात आहात त्यामध्ये यशस्वी व सर्वोत्तम बनण्याकरिता प्रार्थना करावी. चांगल्या संकल्पनांना बळ द्यावे. परस्परांच्या सुखात सहभागी होताना गरजूंना त्यांच्या दु:खाच्या काळात आधार द्यावा''.

राष्ट्रामध्ये सुख व शांती नांदण्यासह राष्ट्राच्या समृध्दीसाठी प्रार्थना करण्याबरोबर इस्लामी राष्ट्रांमध्ये जे चुकीचे प्रकार सुरू आहेत ते थांबविण्यासाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली. त्याचबरोबर लग्नाच्या वयात असलेल्या युवक - युवतींना चांगले स्थळ मिळावेत यासाठी प्रार्थना करावी. 

ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी पारंपरिक वेशात अबालवृध्द मोठया संख्येने उपस्थित होते. नमाज नंतर परस्परांना आलिंगन देत 'ईद - मुबारक' म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. 

आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, नगराध्यक्षा शीतल कटारिया, उपनगराध्यक्ष राजेश जाधव, तहसीलदार बालाजी सोमवंशी, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, दौंड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, आदी या वेळी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

शिरखुर्मा व सुका मेवा....
नमाज पठण नंतर दुपारी मुस्लिम बांधवांच्या आमंत्रणावरून आप्तस्वकीय, मित्रमंडळी व हितचिंतकांनी शिरखुर्मा व सुका मेव्याचा आस्वाद घेतला. त्याशिवाय शहर व परिसरात विविध संघटनांच्या वतीने ईद निमित्त स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.    

Web Title: Daund:Namaz Pathan at Idgah Maidan