Pune Wall Collapse : गावावरून येताच डोळ्यांसमोर सख्ख्या भावांचे मृतदेह
पुणे - रात्रभर प्रवास करून घरी येताच त्यांना समोर दिसले ते आपल्या दोन सख्ख्या भावांचे मृतदेह. गाढ झोपेतच अंगावर भिंत कोसळल्याने अक्षरशः चेंगरलेले मृतदेह पाहून बहीण आणि भावाच्या पायाखालची जमीन सरकली. या दुर्घटनेतील दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूने ससून रुग्णालयाच्या शवागाराचा परिसर शोकाकुल झाला होता.
रावते कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात विविध ठिकाणी बांधकामांची कामे करतात. प्रल्हाद, चंदन, मीना आणि अरुण हे चारही बहीण-भाऊ शहरातील वेगवेगळ्या बांधकामांच्या ठिकाणी काम करीत होते. त्यातील प्रल्हाद चंदन रावते (वय ३०, रा. मध्य प्रदेश) आणि जितू चंदन रावते (वय २३) या दोन सख्ख्या भावांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. मीना आणि अरुण हे शेतीच्या कामासाठी मध्य प्रदेशातील त्यांच्या गावाकडे शनिवारी (ता. २९) रात्री पुण्यातून गेले होते. ते तेथील काम करून सोमवारी रात्री परत पुण्याकडे येण्यासाठी ट्रेनमध्ये बसले. त्यापूर्वी त्यांचे प्रल्हाद आणि जितू यांच्याबरोबर फोनवरून बोलणे झाले होते. त्यांची ट्रेन आज सकाळी पुण्यात पोचली. ते दोघे आंबेगाव येथे राहत असलेल्या घरी आले. मात्र, तेथे त्यांना प्रल्हाद आणि जितू या आपल्या सख्ख्या भावांचे मृतदेह दिसले, अशी माहिती त्यांचा मावसभाऊ दीपक ठाकरे यांनी दिली.
मीना आणि अरुण हेदेखील याच झोपड्यांमध्ये राहतात. पण, गावाकडे गेल्याने या दुर्घटनेतून ते बचावले, असेही त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.