पुणे : मृत्यूच्या संशयामुळे नऊ महिन्यांपासून मृतदेह पडून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

ससून रुग्णालयातील शवागारामध्ये तब्बल नऊ महिन्यांपासून एका तरुणाचा मृतदेह पडून आहे. संबंधित तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याने त्याच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करून योग्य अहवाल द्यावा, गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी मृत तरुणाच्या बहिणीकडून करण्यात येत आहे.

पौड रस्ता -  ससून रुग्णालयातील शवागारामध्ये तब्बल नऊ महिन्यांपासून एका तरुणाचा मृतदेह पडून आहे. संबंधित तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याने त्याच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करून योग्य अहवाल द्यावा, गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी मृत तरुणाच्या बहिणीकडून करण्यात येत आहे. कराड पोलिसांनी तरुणाच्या मृत्यूच्या प्रकरणाची फेरचौकशी करण्यासाठी त्यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे.

अजय गवळी असे मृत तरुणाचे नाव आहे. अजय हा मूळचा कराड येथील असून, नोव्हेंबर २०१८ मध्ये तो कराड शहरात तेथील पोलिसांना बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यास उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. शस्त्रक्रियेनंतर त्याच्या तब्येतीत काही प्रमाणात सुधारणा झाली; मात्र, त्यानंतर त्याला त्रास झाल्याने त्याचा ससून रुग्णालयातच २९ नोव्हेंबर २०१८ रोजी मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालामध्ये अजयचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे नमूद केले आहे. हे प्रकरण कराड पोलिसांच्या हद्दीत घडल्याने पुणे पोलिसांनी शून्य क्रमांकाने हे प्रकरण कराड पोलिसांकडे वर्ग केले. 

दरम्यान, या प्रकरणाशी पुणे पोलिसांचा थेट संबंध येत नसल्याने त्यांच्याकडून बाबर यांना त्यांच्या भावाचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यास बाबर यांनी विरोध केला आहे. या प्रकरणामध्ये पुणे पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची विनंती केली आहे. 

अजय गवळीने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर स्वतः विष घेऊन आत्महत्या केली. त्याच्याविरुद्ध कऱ्हाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबास गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच्या कुटुंबीयांनी माझ्याशी अद्याप संवाद साधला नाही; परंतु त्यांनी ससूनमधील त्याचा मृतदेह ताब्यात घेतला पाहिजे.
 तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सातारा 

माझ्या भावाचे त्या मुलीशी प्रेमसंबंध नव्हते. तिने स्वतःच अंगावर वार केले. त्यानंतर तिच्या आईने पूर्वीच्या भांडणाच्या रागातून तिला माझ्या भावानेच हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगायला लावले. त्यानंतर काही जणांनी भावाला ॲसिड देऊन मारण्याचा प्रयत्न केला. कऱ्हाड पोलिस सत्य जाणून घेण्यास तयार नाहीत.
नीलम बाबर, मृत तरुणाची बहीण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead body have been lying for nine months