पदवीधर मतदारसंघाच्या नावनोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

प्रश्नांची उत्तरे संकेतस्थळावर

- मतदार नोंदणी कार्यक्रम

पुणे : दर सहा वर्षांनी होणाऱ्या पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी जुलै 2020 मध्ये निवडणूक होणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून, पदवीधर व शिक्षक नागरिकांनी 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत मतदार नोंदणी करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय कार्यकर्त्यांचे मतदार नाव नोंदणीकडे दुर्लक्ष झाले आहे. तर पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरीता मतदारांकडून नाव नोंदणीमध्ये आतापर्यंत आलेल्या प्रतिसादावरून उदासीनता दिसून येत आहे. सहा नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणीची मुदत आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासह 5 विभागांमध्ये 5 जागांचा कार्यकाल 19 जुलै 2020 रोजी संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी याकरीता निवडणूक होणार आहेत. या मतदारसंघामध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक, पुणे विभाग शिक्षक यांचा समावेश आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विधानपरिषदेचा कालावधी पुढील वर्षी 19 जुलै 2020 रोजी संपुष्टात येणार होता. त्यापूर्वीच कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याने त्यांनी राजीनामा दिलेला आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी हाती घेण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी नव्याने मतदार यादी बनविण्यात येत असून, सहा नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण अशा २१ विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदार म्हणून नावनोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

काय आहेत अटी?

पदवीधर मतदारसंघासाठी संबंधित मतदार एक नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे. शिक्षक मतदार संघासाठी एक नोव्हेंबर २०१३ पासून एक नोव्हेंबर २०१९ या कालावधीत कोणतीही तीन वर्षे किमान माध्यमिक शाळेचा दर्जा असलेल्या संस्थेत काम केलेल्या शिक्षकांना नावनोंदणी करता येणार आहे.

प्रश्नांची उत्तरे संकेतस्थळावर

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील मतदारांच्या प्रश्नांची उत्तरे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या www.divcommpune.in या वेबसाइटवर देण्यात येणार आहेत. '१९५०' या दूरध्वनी क्रमांकावर शंकांचे निरसन केले जाणार आहे. यापूर्वीच्या पदवीधर मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांना नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

अशी असेल अर्हता

जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि 1 नोंव्हेंबर, 2019 च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे इतक्या एकूण कालावधीकरिता माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी दर्जाची अशी विनिर्दिष्ट केलेली नसेल अशा राज्यातील कोणत्याही शिक्षक संस्थेमध्ये अध्यापन करीत आहे, अशी प्रत्येक व्यक्ती, मतदार यादीत तिचे नाव अंतर्भूत करण्यास पात्र आहे.

मतदार नोंदणी कार्यक्रम

मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत : 6 नोव्हेंबर

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : १९ नोव्हेंबर
दावे व हरकती स्वीकारणे : ३ ते ९ डिसेंबर
दावे व हरकती निकाली काढणे : २६ डिसेंबर
अंतिम मतदार यादी : ३० डिसेंबर २०१९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline for graduate constituency enrollment is November 6