
बारामती-इंदापूर रस्त्यावरील लिमटेक येथे पालखी महामार्गासाठी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Accident Death : खड्ड्यात पडून बारामतीनजिक दुचाकीस्वाराचा मृत्यू
बारामती - येथील बारामती-इंदापूर रस्त्यावरील लिमटेक येथे पालखी महामार्गासाठी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महेश तुळशीराम ठोंबरे (वय-28, रा. खताळपट्टा, ता. बारामती) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
शनिवारी (ता. 16) रात्री साडे अकराच्या सुमारास महेश त्याच्या पल्सरवरून खताळपट्टा येथे निघाला होता. पालखी महामार्गाचे काम सुरू असल्याने लिमटेक येथे रस्त्याच्या कडेला खड्डे खोदले आहेत. त्या खड्ड्यात पडून महेशचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने दुचाकी खड्ड्यात पडल्याने महेश याला तात्काळ कोणाची मदत मिळू शकली नाही.
ही घटना पोलिसांना समजल्यानंतर महेश याच्या दुचाकी नंबर वरून पत्ता शोधत पोलिसांनी महेशच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास महेश याला रुई ग्रामीण रुग्णालय येथे आणले मात्र मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शव विच्छेदनानंतर त्याच्यावर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात एक मुलगा, मुलगी ,पत्नी आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
कारवाईची मागणी....
पालखी महामार्गाचे काम सुरू असताना ठेकेदाराने दक्षता न घेतल्याने महेशचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी केला आहे. बॅरिगेट अथवा सूचनाफलक लावले नसल्यानेत्यामुळे जाण्या येण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.