तिचा मृत्यूही एकाकीच.... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

धुरू यांचा तीन ते चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. धुरू या त्यांच्या सदनिकेमध्ये एकट्या राहात असल्याने त्यांच्याविषयी इतरांकडे माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, मुंबई येथे राहणाऱ्या त्यांच्या भावांशी संपर्क साधण्यात आला. 
- अजय कदम, पोलिस निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे 

पुणे - शेवटचा श्‍वास अगदी एकाकीपणे घ्यायला लागावा, एवढेच नव्हे तर त्याबाबत तीन- चार दिवस कोणाला खबरच लागू नये, असे एखाद्याच्या बाबतीत घडले तर त्याला कोणत्या प्राक्‍तनाचे संदर्भ जोडायचे, असा प्रश्‍न पडतो. डेक्‍कन परिसरात अशीच घटना घडली आहे. काही वर्षांपासून घरात एकट्याच राहत असलेल्या एका वृद्ध महिलेचा तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. वृद्ध महिलेच्या शेजारी राहणाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

अरुणा धुरू (वय 86, रा. राहुल अपार्टमेंट, विधी महाविद्यालय रस्ता) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. सोमवारी सकाळपासून सोसायटीमध्ये दुर्गंधी पसरली होती. धुरू यांचे शेजारी अरुण कर्णिक यांनी सकाळी अकरा वाजता डेक्कन पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर थोड्या वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा उघडण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण केले. दरवाजा उघडल्यानंतर घरामध्ये धुरू यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या नातेवाइकांचा संपर्क क्रमांक सोसायटीतील कोणाकडे नव्हता. मात्र, त्यांच्या मालमत्तेचे प्रकरण हाताळणाऱ्या वकिलांमार्फत मुंबई येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाशी संपर्क साधण्यात आला. ते पुण्यात आल्यानंतर त्यांनी धुरू यांचा मृतदेह ताब्यात घेतला. 

धुरू मागील दहा वर्षांपासून सोसायटीतील सदनिकेमध्ये आपल्या बहिणीसमवेत राहात होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीचे निधन झाले. त्यानंतर सदनिकेमध्ये त्या एकट्याच राहत होत्या. सोसायटीचे पदाधिकारी, शेजारी यांच्याशी त्यांचा संपर्क नसल्याने त्यांना काय झाले आहे, याविषयी कोणालाच काही कल्पना नव्हती. सोसायटीतील नागरिकांनी सांगितल्यानुसार, धुरू या घराबाहेर पडत नसत. तीन ते चार दिवसांपासून त्यांच्याकडे येणारी वृत्तपत्रे खालीच पडून होती. सोमवारी दुर्गंधीचा त्रास जाणवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. 

धुरू यांचा तीन ते चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. धुरू या त्यांच्या सदनिकेमध्ये एकट्या राहात असल्याने त्यांच्याविषयी इतरांकडे माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, मुंबई येथे राहणाऱ्या त्यांच्या भावांशी संपर्क साधण्यात आला. 
- अजय कदम, पोलिस निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे 

Web Title: Death of the old woman in pune