एनडीएच्या बसच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे : ''रस्ता ओलांडताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) भरधाव बसने धडक दिल्यामुळे एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोर चौकात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.

सुरेखा सुभाष निकाळजे (वय 50) असे मृत महिलेचे नाव आहे. एनडीएची बस ही सेंट्रल बिल्डिंगकडून बोल्हाई चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. त्यावेळी बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोरील चौकात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेलाबसने धडक दिली. त्यात ही महिला बसच्या समोरील चाकाखाली आल्यामुळे गंभीर जखमी झाली. पोलिसांनी या महिलेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यात येत आहे, असे बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी सांगितले.

या भागात ससून रुग्णालय, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या चौकात वाहनांची वर्दळ असते. तसेच, वाहनचालकांना हिरवा सिग्नल सुरू होण्यापूर्वीच वाहने पुढे नेण्याची घाई असते. त्यामुळे या चौकात अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

Web Title: Death of a pedestrian woman by the NDA bus