परीक्षेत तब्येत बिघडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पिंपरी - परीक्षेचा पेपर लिहिताना तब्येत बिघडलेल्या विद्यार्थिनीचा घरी सोडल्यावर मृत्यू झाला. मंगळवारी (ता. २) सकाळी अकराच्या सुमारास भाटनगरमध्ये ही घटना घडली. दरम्यान, रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी शाळा प्रशासनाने विद्यार्थिनीला कोणी घरी नसताना घरी सोडल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. 

काजल गोरख तुरुकमारे (वय १२, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. भाटनगरमधील महापालिकेच्या साबळे प्राथमिक विद्यालयात काजल सातवीत शिकत होती. सोमवारी सकाळी तिची आई तिला शाळेत सोडवून धुण्याभांड्याच्या कामाला गेली. मात्र, काजलची तब्येत अचानक बिघडल्याचे तिच्या मैत्रिणीने वर्गशिक्षिकेला सांगितले. घरापेक्षा जवळ महापालिकेचा दवाखाना असताना वर्गशिक्षिकेने तिला शाळेतून घरी सोडले. परंतु, तिची आई कामाला व छोटी बहीण, भाऊ शाळेत गेले होते. घरी कोणी नसतानाही तिला घराबाहेर सोडून शिक्षिका शाळेत आल्या. काही वेळाने शेजारच्यांनी एका खासगी दवाखान्यात नेल्यानंतर तिला वायसीएम रुग्णालयात हलविण्यास सांगितले. वायसीएममध्ये घेऊन गेले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, शाळा प्रशासनाने तिला त्वरित दवाखान्यात हलविले असते, तर काजलचे प्राण वाचले असते. शाळेच्या हलगर्जीपणामुळे काजलचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

याबाबत शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, ‘‘घटना दुर्दैवी असून, यासंदर्भातील अहवाल घेतला आहे. हा अहवाल आयुक्तांसमोर सादर करून दोषींवर निश्‍चित कारवाई केली जाईल.’’

Web Title: Death of the student by exam