
Vasant More: कानून के हाथ बहूत लंबे होते है… वसंत मोरे यांची सूचक पोस्ट
मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून एकाला काल संध्याकाळी अटक करण्यात आली. या आरोपीला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाला व्हॉट्सअप मेसेज करून खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वसंत मोरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केलं. या आरोपीने कुणाच्या सांगण्यावरून ही धमकी दिली का? याचा पोलीस शोध घेत आहेत. तर, पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर वसंत मोरे यांनी कानून के हाथ बहोत लंबे होते है, अशी सूचक फेसबुक पोस्ट केली आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींला अटक केल्यानंतर वसंत मोरे यांनी पोलिसांचे आभार मानत ही पोस्ट केली आहे. तसेच पोलिसांचे आभारही मानले आहेत. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. कानून के हाथ बहुत लंबे होते है ! धन्यवाद… भारती विद्यापीठ पोलीस, असं वसंत मोरे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे धमकी प्रकरण?
वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता. अल्पिया शेख या नावाने हा मेसेज आला होता. त्यामध्ये रुपेश मोरेला 30 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तुझ्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट करण्यात आले आहे. 30 लाख रुपये दे नाही तर या सर्टिफिकेटचा गैरवापर करण्यात येईल, अशी धमकी त्याला मेसेज करून देण्यात आली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी मुंबईतून एकाला अटक केल आहे. हा संशयित आरोपी कोण आहे? त्याचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का? किंवा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.